
सोशल मीडियावर रील बनवल्याबद्दल वडील राधिकावर रागावले.
हरियाणा: भारतातून टेनिस विश्वाला हादरवणारी एक दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी हरियाणातील गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या वडिलांवरच हत्येचा आरोप करण्यात आला आहे. वडिलांनी राधिकावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन तिला लागल्या. ज्यात तिचा मृत्यू झाला. राज्य स्तरावर गौरव मिळवून देणाऱ्या आपल्या लेकीचा वडील खुन का करतील याचा तपास पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास २५ वर्षीय टेनिस खेळाडू राधिका यादवच्या वडिलांनीच तिची गोळी घालून हत्या केली. टेनिस खेळाडू तिच्या कुटुंबासह येथील सेक्टर ५७ मधील पहिल्या मजल्यावर राहत होती. राधिकाला गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुग्राम पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आणि घटनास्थळावरून रिव्हॉल्व्हर जप्त केला.
हत्येचे कारण काय?
सोशल मीडियावर रील बनवल्याबद्दल वडील राधिकावर रागावले होते. याबद्दल त्यांच्यात भांडण झाले होते. दरम्यान त्यांनी तिला गोळ्या झाडून मारले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तथापि, पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.
राधिका यादव कोण होती?
राधिका राज्यस्तरीय टेनिसपटू होती आणि तिने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन (ITF) मध्ये दुहेरी टेनिसपटू म्हणून राधिका यादवचे रँकिंग ११३ होते. राधिका यादवचा जन्म २३ मार्च २००० रोजी झाला होता आणि ती ITF दुहेरीत टॉप २०० मध्ये होती.