
सांगलीसह रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरमधील शेकडो कार्यकर्त्यांचा काल मुक्तागिरी येथे शिवसेनेत प्रवेश
मुंबई: सांगली जिल्ह्यात शिवसेना पक्ष मजबूत झाला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सांगली मिरज कुपवाडचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरवेल, असा विश्वास शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सांगलीतील पाच माजी नगरसेवकांनी तसेच रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरमधील उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. या पक्ष प्रवेश सोहळ्यास आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, चंद्रहार पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे. ग्रामीण भागातून मोठं झालेलं नेतृत्व असल्याने ते इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय देतात. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकेंच्या आदेशाने अयोध्येत कारसेवेसाठी गेलेले सुरेश शेळके यांनीही आज मूळ शिवसेनेत प्रवेश केला. यातून बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेच पुढे घेऊन जात आहेत यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले.
आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे काँग्रेस प्रदेश सचिव सागर वनखंडे, सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, सचिव राज सोनार, माजी नगराध्यक्ष मोहनसिंग राजपूत, माजी नगरसेवक प्रकाश व्हनकडे, माजी नगरसेवक सुरेश शेळके, माजी नगरसेवक अश्विनी कांबळे, माजी नगरसेवक कल्लाप्पा कांबळे, माजी सभापती अनिता वनखंडे, माजी शिक्षण उपसभापती तानाजी व्हनकडे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे, रत्नागिरीमधील उबाठाच्या महिला संपर्क प्रमुख वर्षा पितळे, कोल्हापूर विधानसभा संपर्क प्रमुख प्राची पोतदार, दक्षिण कराड विधानसभा संपर्क प्रमुख रोहीणी लोंढे, मुक्ताईनगरचे उबाठाचे विष्णू राणे, भुसावळमधील उबाठाचे आदित्य राणे या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला