
मुंबई: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. मुंबईत घरे खरेदी करताना कोणत्याही मराठी माणसाचा हक्क कुणालाही डावलू दिला जाणार नाही. जर एखादा विकासक मराठी माणसाला घरे विक्रीसाठी नाकारत असेल, अशा विकासक किंवा व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. मराठी माणसाच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि मराठी माणसाला घरे खरेदीसाठी प्राधान्य मिळावे, यासाठी लवकरच धोरण निश्चित केले जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील धोरण निश्चित केले जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
नवीन इमारतीत मराठी माणसाला मुंबईत घरे खरेदीसाठी आरक्षण ठेवण्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता, त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेश राठोड, प्रसाद लाड, ॲड.अनिल परब, सचिन अहिर, हेमंत पाटील यांनी उपप्रश्न विचारले.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, विविध शासकीय गृहनिर्माण योजनेमध्ये एससी, एसटी, एनटी, व डीटी, माजी सैनिक, कलाकार, राज्य व केंद्र शासनाचे कर्मचारी, अंध व दिव्यांग यांच्यासाठी विशिष्ट टक्केवारीने आरक्षण आहे.
शेवटी, मराठी भाषिक नागरिकांना घर खरेदी करताना जर कुणी बांधकाम व्यावसायिक भेदभाव करत असेल, तर राज्य शासन त्यांच्यावर कठोर कारवाई करेल, असे आश्वासन देसाई यांनी दिले.