
लॉर्ड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात होत आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर हा सामना खेळवला जातोय. या मालिकेत आतापर्यंत भारत आणि इंग्लंड १-१ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे लॉर्ड्सवर विजय मिळवून दोन्ही संघ आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील.
ली़ड्समधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली होती. त्यानंतर ब्रर्मिंगहॅमच्या एजबेस्टन कसोटीत भारताने इंग्लंडवर दमदार मात करीत मालिकेत बरोबरी गाठली होती. आता तिसरा सामना रंगतोय. या कसोटीसाठी भारतीय संघात फारसा बदल केला जाणार नाही. लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडने बुधवारीच संघ जाहीर केला आहे.
लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडचा संघ
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने बुधवारी आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंड संघात जोफ्रा आर्चरला जोश टंगच्या जागी स्थान देण्यात आले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी जाहीर झालेल्या इंग्लंडच्या संघात सॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर यांचा समावेश आहे.
जोफ्रा आर्चर चार वर्षांनी कसोटीत
वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर जवळजवळ चार वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. अलीकडेच, त्याने एजबेस्टन येथे इंग्लंडच्या सराव सत्रादरम्यान नियमितपणे गोलंदाजी केली आणि पुनरागमनाची चिन्हे दिसू लागली. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेडन मॅक्युलम यांनीही त्याच्या निवडीबद्दल संकेत दिले होते. ते म्हणाले की, लॉईसवर पोहोचल्यानंतर आम्ही यावर निर्णय घेऊ, आर्चरच्या तंदुरुस्तीबद्दल विचारले असता ते म्हणाले, तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि खेळण्यास तयार आहे.
तिसऱ्या कसोटीआधी शुभमनसाठी गुड न्यूज
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या नवीन क्रमवारीत उलथापालथ झाल्पाचे दिसून येत आहे. विशेषतः, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटला आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे. त्याच वेळी, भारताचा नवोदित फलंदाज शुभमन गिलने उल्लेखनीय प्रगती करत थेट सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.यशस्वी जयस्वालच्या रेटिंगमध्ये बदल झाला असला तरी, त्याच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग ८५८ आहे.एजबेस्टन कसोटीत ७ बळी घेणाऱ्या मोहम्मद सिराजच्या (६१९ रेटिंग) क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. त्याने ६ स्थानांची झेप घेत २२ वे स्थान पटकावले आहे.