Wednesday, July 9, 2025

लोकलमधील वाढती गर्दी रोखणार कशी?

लोकलमधील वाढती गर्दी रोखणार कशी?

देशाच्या कानाकोपऱ्यातून रोजगारासाठी, उपजीविकेसाठी, शिक्षणासाठी मुंबई शहरात दररोज लोंढेच्या लोंढे आजही येतात, ही बाब नव्याने सांगण्याची गरज नाही. मुंबई शहरातील या वाढत्या गर्दीचा सर्वाधिक ताण सार्वजनिक वाहतूक सेवेपैकी लोकल ट्रेनवर पडतो. मुंबईची लोकल ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. या लोकल ट्रेनने मुंबईत सुमारे ७५ लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या तशी पाहिली तर संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येच्या अर्ध्याहून अधिक आहे. या लोकलमधील अनियंत्रित गर्दीवर नियंत्रण मिळवणे आता रेल्वे प्रशासनाला कठीण जाते आहे.


एकेकाळी रेल्वे प्रवास करताना सकाळी व संध्याकाळी प्रवास करणे लोक टाळायचे. या वेळेमध्ये रेल्वेमध्ये भरमसाट असणारी गर्दी ही नित्याचीच बाब आहे; परंतु अलीकडच्या काळात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रेल्वेमध्ये गर्दी हमखासपणे पाहावयास मिळत आहे. या गर्दीमुळे रेल्वेच्या सुविधेवर ताण पडत चालल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.


कार्यालयीन वेळेत बदल केल्यास गर्दी विभागली जाईल, असा विचार करून रेल्वे प्रशासनाने विविध कंपन्यांशी, शासकीय कार्यालयांशी संपर्क साधत कार्यालयीन वेळेत बदल करण्याविषयीचे पर्याय सुचविले आहेत. विविध कारणांमुळे दररोज रेल्वे प्रवासामध्ये होणाऱ्या अपघातात प्रवाशांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मुंबईकरांचा सुखकर प्रवास कसा होईल, यासाठी अनेक उपाययोजना रेल्वे प्रशासनाकडून केल्या जात आहेत. वातानुकूलित (एसी) लोकल हा त्याचाच एक भाग; परंतु एसी लोकल प्लॅटफॉर्मवर येण्यास उशीर झाला तर नियमित लोकलसाठी प्लॅटफॉर्मवर गर्दी झालेली दिसते.


मध्य रेल्वेने ही गर्दी टाळण्यासाठी एक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील केंद्र व राज्य सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस, विविध महामंडळे, बँका, महापालिका, महाविद्यालये अशा ८०० हून अधिक संस्था, कंपन्यांनी आपल्या कार्यालयीन वेळेत बदल करावेत, असे विनंती पत्र मध्य रेल्वेने पाठवले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दररोज १ हजार ८१० लोकल फेऱ्या चालवल्या जातात. त्यातून तब्बल ३५ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. मुंबईत रोज सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयात जाण्यासाठी आणि कार्यालयातून घरी परतण्याच्या वेळेत लोकलला असलेली गर्दी पाहता अपघातांच्या घटना या वेळेतच होताना दिसतात. २००५ ते जुलै २०२४ दरम्यान, लोकल ट्रेनशी संबंधित घटनांमध्ये ५१ हजार ८०२ जणांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक दुर्घटना या लोकलमधून पडल्याने झाल्या! ही आकडेवारी धक्कादायक आहे.


खोपोली, कर्जत, कसारा, विरार, पनवेलपर्यंत विस्तारत गेल्यात. त्याचा ताण खऱ्या अर्थाने त्या त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर तसेच रेल्वे सेवेवर पडला आहे. लांबवरच्या लोकलमध्ये आता सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची गर्दी ठरलेली असते. आता गर्दी कमी करावी यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे परिसरातील विविध सरकारी आणि खासगी कार्यालयांना त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. या तोंडदेखल्या उपायाने लोकलमधील वाढती गर्दी किती प्रमाणात कमी होईल, याबाबत साशंकता आहे. तरीसुद्धा मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दी नियोजनाबाबत उचललेल्या पावलांचे स्वागत करायला हवे. मुंबईतील अनेक आस्थापनांमधील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याच्या निर्णयावर डबेवाल्यांच्या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. दुपारचा जेवणाचा डबा पोहोचविणार कसा? हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे.


मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून उपाययोजना सुरू असताना मध्य रेल्वेने गाड्यांच्या वेळापत्रकांवर लक्ष देण्याची गरज आहे. कधीकधी हवामान किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे लोकल ट्रेन उशिरा धावतात, ज्यामुळे लोकलमध्ये गर्दी वाढते. त्यात मध्य रेल्वेची लोकल ‘लेट लतिफ’ म्हणूनच आजही ओळखली जाते. गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा असतात. तांत्रिक बिघाड दुरुस्त करून गाड्या वेळापत्रकाप्रमाणे कशा धावतील याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. त्यात सिग्नल बिघाडामुळे होणारा विलंब रेल्वे प्रवाशांच्या अंगवळणी पडला आहे.


विशेष गाड्या चालवणे, रेल्वे रुळांची दुरुस्ती करणे हे उपाय रेल्वे प्रशासनाने तातडीने केले पाहिजेत. मुंबई लोकल हे केवळ वाहतुकीचे साधन नसून, कोट्यवधी मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे.


अन्य प्रवासी सेवांच्या तुलनेत ही सेवा स्वस्त आणि वेगवान असल्याने दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, घाटकोपर, ठाणे, वाशी, कोपरखैराणे, घणसोली, रबाळे यांसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खासगी कार्यालये आहेत. ठिकठिकाणी एमआयडीसी विखुरल्या असल्याने तेथील प्रमुख रेल्वे स्टेशनवरही ताण वाढत चालला आहे. मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोतील प्रवासी संख्या वाढत असली तरी उपनगरीय रेल्वेच्या तुलनेत हा आकडा केवळ १० टक्केच आहे.


दररोज सरासरी आठ लाख प्रवाशांची या चारही मार्गिकांवर ये-जा होते. त्यासाठी मेट्रोच्या जवळपास ९९९ फेऱ्या होत आहेत. आठ लाख हा आकडाही मूळ नियोजनापेक्षा ४० टक्के कमी आहे! रेल्वेच्या सुधारणांसोबतच गर्दी कमी होण्याच्या दृष्टीनेही रेल्वेकडून हालचाली होत आहेत. याआधीही रेल्वेकडून मुंबईतील कार्यालयांना त्यांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता पुन्हा एकदा रेल्वेकडून पत्र लिहून कार्यालयांना वेळेत लवचिकता आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळाला, तर लोकलच्या गर्दीचे नियोजन बऱ्याच प्रमाणात यशस्वी होऊ शकेल, अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.

Comments
Add Comment