घाटात प्रेत फेकणाऱ्यांचा पर्दाफाश; एका महिलेसह तिघांना बेड्या!

  49


पोलादपूर: आंबेनळी आणि कशेडी घाटरस्त्यांवर मृतदेह टाकून पळून जाण्याच्या घटनांना आता चाप बसणार आहे. पोलादपूर पोलिसांनी एका बेवारस मृतदेहाच्या तपासात मोठे यश मिळवले असून, एका महिलेसह तीन आरोपींना गजाआड केले आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कर्नाटक सीमावर्ती भागात सुरू असलेला दोन मुख्य आरोपींचा पोलिसांना गुंगारा देण्याचा खेळ अखेर संपुष्टात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी ही माहिती दिली.



नेमकं काय घडलं?


३० एप्रिल २०२५ रोजी जुन्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटरस्त्यावर दरीत एका अज्ञात व्यक्तीचा सुमारे तीन दिवस कुजलेला मृतदेह आढळून आला होता. भोगावच्या पोलीस पाटील शुभांगी उतेकर यांनी खबर दिल्यानंतर पोलादपूर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून तपास सुरू केला. मृतदेह कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.



पोलिसांनी तांत्रिक आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या चार दिवसांत मृतदेहाची ओळख पटवली. मृत व्यक्तीचे नाव सुनील दादा हसे (वय ५४, रा. अंबड, अकोले, अहमदनगर) असे होते. तपासाअंती, अक्षय जाधव या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या खुनात आणखी दोन मुख्य आरोपींचा सहभाग असल्याचे उघड झाले.


सुनील हसे हे वॉक्सवॅगन कार भाड्याने देऊन स्वतः वाहन चालवून उपजीविका करत होते. त्यांची ओळख वंदना दादासाहेब पुणेकर (वय ३६, रा. जयसिंगपूर, कोल्हापूर) हिच्याशी लिफ्ट देण्याच्या निमित्ताने झाली. वंदनाला सुनील हसे श्रीमंत वाटल्याने तिने त्याला जाळ्यात ओढले. मात्र, त्याच्याकडे फारसे पैसे नसल्याचे लक्षात येताच, तिने अक्षय जाधव सोबत त्याला संपवण्याचा कट रचला.


या कटात वंदनाने तिचा नवरा मोहन पांडुरंग सोनार (वय ५४, रा. बोरसूत, रत्नागिरी) याची मदत घेतली. मोहनच्या मदतीने वंदना पुणेकर हिने २७ एप्रिल २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास सुनील हसे याला त्याच्याच गाडीत मागील सीटवर बसवून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर कराड-चिपळूणमार्गे पोलादपूरच्या दिशेने येत असताना, गाडीतच ओढणीने गळा आवळून त्याला ठार मारले आणि पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटातील जुन्या महामार्गालगत दरीत मृतदेह फेकून दिला.


या घटनेनंतर वंदना पुणेकर आणि मोहन सोनार हे दोघे आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून फरार होते. ते आपली ओळख लपवत कर्नाटकमधील सीमावर्ती भागात लपून राहत होते.


रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या नेतृत्वाने पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या पथकाने अथक प्रयत्न करून, अखेर वंदना दादासाहेब पुणेकर आणि मोहन पांडुरंग सोनार या दोन्ही मुख्य आरोपींना महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातून ताब्यात घेतले.


पोलादपूर पोलिसांनी अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यापासून ते खुनाचे धागेदोरे स्पष्ट करण्यापर्यंत केलेल्या या यशस्वी तपासाचे पोलादपूर तालुक्यातून विशेष अभिनंदन होत आहे. या कारवाईमुळे कशेडी आणि आंबेनळी घाटात होणाऱ्या अशा घटनांना आता पायबंद बसेल अशी आशा निर्माण झाली आहे.


Comments
Add Comment

इस्रायलचे अधिकाऱ्यांसह सैनिकांना कुराण आणि अरबी भाषा शिकण्याचे आदेश

जेरुसलेम : इस्रायलकडून मोसादचे अधिकारी आणि आपल्या सैनिकांसाठी एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार आता

आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरी नदी स्वच्छतेसह रस्ते पुलांची कामे नियोजित वेळेत करण्यात यावी: पंकज भुजबळ

पुरवणी मागण्यांवर चर्चा करतांना आमदार पंकज भुजबळ यांची सभागृहात मागणी  मुंबई: नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या

'निस्तार' भारतीय नौदलात दाखल, पहिले स्वदेशी पाण्याखालील मदतकार्य करणारे जहाज

विशाखापट्टणम : 'निस्तार' हे स्वदेशी रचना आणि निर्मिती असणारे पाण्याखाली उतरून मदतकार्य करणारे पहिलेच जहाज

मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो

सर्व ७ तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या ७२.६१ टक्के जलसाठा मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा

OnePlus Nord 5 विरुद्ध Poco F7 5G: मिड-रेंज फ्लॅगशिपची सविस्तर तुलना

मुंबई : आज लाँच झालेला OnePlus Nord 5 आणि जून २०२५ मध्ये बाजारात आलेला Poco F7 5G या दोन शक्तिशाली स्मार्टफोनमुळे भारतातील

ऑनलाइन गेममध्ये हरल्याने, १६ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक: ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना नाशिक रोड परिसरामध्ये घडली आहे.