मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मुंबई बाहेरचे आमदार आकाशवाणी आमदार निवासामध्ये वास्तव्यास आहेत. याच आमदार निवासात मंगळवारी रात्री हाणामारी झाली. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदारा निवासाच्या कँटिनमधून जेवण मागवले होते. या जेवणात निकृष्ट दर्जाच्या डाळीचा वापर करण्यात आल्याचे बघून आमदार संजय गायकवाड संतापले. त्यांनी निकृष्ट डाळीबाबतचा राग कँटिनच्या वेटरवर काढला. आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनच्या वेटरला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आमदार संजय गायकवाड यांच्या कृतीबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. निकृष्ट अन्न देऊन कँटिन प्रशासन आमदारांच्या जिवाशी खेळत आहे. याचाच राग आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केल्याचे मत काहींनी व्यक्त केले. तर आमदाराने वेटरला मारझोड करणे चुकीचे आहे, असे मत काहींनी व्यक्त केले. यामुळे बुधवार ९ जुलै रोजी अधिवेशनात या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.