
१२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत तब्बल १२ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. त्यांचा आगामी चित्रपट 'बिन लग्नाची गोष्ट' येत्या १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या घोषणेने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही वर्षांपासून प्रिया आणि उमेशला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती आणि आता 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटातून ती पूर्ण होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले, ज्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
पोस्टरमधील दृश्यात प्रिया बापट हाताची घडी घालून, मिश्कील चेहऱ्याने आत्मविश्वासाने उभी दिसते, तर उमेश कामत हातात हार आणि डोक्यावर मुंडावळ्या बांधून लग्नासाठी तयार असल्यासारखा दिसतो, पण परिस्थिती काहीतरी वेगळी असल्याचे त्यात सूचित होते. यातूनच ही कथा पारंपरिक विवाहसंस्थेच्या पलीकडे जाऊन नात्यांची नवी मांडणी करणार असल्याचे स्पष्ट होते.
चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी चित्रपटाबद्दल सांगितले की, "ही प्रेमाची, नात्यांमधील समज-गैरसमजांची आणि वर्षानुवर्षे मनात जपलेल्या गाठी सुटण्याची गोष्ट आहे. हा चित्रपट आजच्या काळाचा आरसा असून, प्रेक्षकांना त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसेल. काहींना नवीन प्रश्न पडतील, तर काहींना जुन्याच प्रश्नांची नवी उत्तरे मिळतील. हलक्या-फुलक्या प्रसंगातून मांडलेली ही गोष्ट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल."
निर्माते नितीन वैद्य यांनी प्रिया आणि उमेशच्या केमिस्ट्रीबद्दल बोलताना आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "प्रिया आणि उमेशची केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी नेहमीच खास असते. इतक्या वर्षांनी ते माझ्या चित्रपटातून एकत्र येत आहेत, याचा मला आनंद आहे. या चित्रपटाची संकल्पना हटके असून ती आजच्या काळाशी थेट संबंधित आहे."
गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित, तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटाचे सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत.