
विशाखापट्टणम : 'निस्तार' हे स्वदेशी रचना आणि निर्मिती असणारे पाण्याखाली उतरून मदतकार्य करणारे पहिलेच जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने 8 जुलै रोजी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले.
या युद्धनौकेची रचना आणि बांधणी भारतीय नौवहन नोंदणीच्या(आयआरएस) वर्गीकरण नियमांनुसार करण्यात आली आहे. हे जहाज अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बनावटीचे असून ते खोल समुद्रात उतरून बचाव कार्य करू शकते. जगभरातील निवडक नौदलांमध्ये अशा क्षमतेची जहाजे आहेत.
या जहाजाचे 'निस्तार' हे नाव संस्कृत भाषेतून निवडले असून त्याचा अर्थ मुक्ती, बचाव किंवा तारणहार असा होतो. सुमारे 10,000 टन वजनाचे आणि 118 मीटर लांबीचे हे जहाज अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणांनी सुसज्ज आहे आणि 300 मीटर खोल समुद्रात डायव्हिंग करण्याची क्षमता त्यात आहे. या जहाजात 75 मीटर खोल समुद्रात जाऊन बचावकार्य करण्यासाठी बाजूला साईड डायव्हिंग मंच देखील आहे.
हे जहाज डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसल (डीएसआरव्ही) साठी महत्वाचा आधार,’मदर शिप' म्हणून देखील काम करु शकेल, जे पाण्याखाली पाणबुडींमध्ये आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी वापरले जाऊ शकते. 1000 मीटर खोलीपर्यंत डायव्हर मॉनिटरिंग आणि बचाव कार्य करण्यासाठी हे जहाज रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल्सचे नियोजन करण्यासाठी देखील सुसज्ज आहे.
जवळजवळ 75% स्वदेशी सामग्रीसह निस्तारचे दाखल होणे ही भारतीय नौदलाच्या स्वदेशी बांधकामाच्या शोधात आणखी एक अभिमानास्पद पाऊल आहे आणि भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.