
मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात आधी मोर्च्याला परवानगी नाकारून आणि त्यानंतर संबंधित नेत्यांची धरपकड केल्याप्रकरणावर एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. मराठी भाषा संवर्धन आणि अस्मितेच्या मुद्द्यावर शांततेत काढला जाणारा हा मोर्चा हा मीरा भाईंदर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे चांगलाच तापला. या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची गृह विभागाद्वारे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता निकेत कौशिक आयुक्तपदाची धुरा सांभाळतील.
नेमकं काय आहे प्रकरण?
मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यावसायिकांनी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून काल मराठी मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे मोर्चा सुरू होण्याआधीच मनसेच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ८ जुलैच्या मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. यापूर्वीच त्यांना शहरात उपस्थित राहू नये, अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती नाकारल्यामुळे ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आली. मात्र त्यामुळे मनसैनिक आणखीनच आक्रमक झाले.
पोलिसांकडून करण्यात आलेल्या धरपकड कारवाईवर संताप व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सल्ला मसलत करत, शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे देखील मोर्चात सहभागी झाले. पण, पोलिसांच्या आक्रमक कारवाईमुळे तापलेल्या मोर्चेकरांचा रोष सरनाईकांवर आला. सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी येताच त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यांच्यावर पाण्याची बॉटल देखील भिरकवण्यात आली.
मोर्चाला परवानही नाकारून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी काल दिले होते. चौकशीचे आदेश दिल्यानंतर २४ तासांतच पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.