Wednesday, July 9, 2025

गुजरातमध्ये पूल कोसळला; ३ मृत्यू, अनेकजण बेपत्ता

गुजरातमध्ये पूल कोसळला; ३ मृत्यू, अनेकजण बेपत्ता

नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली


अहमदाबाद : गुजरातमध्ये पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (आज) सकाळी आणंद आणि वडोदराला जोडणारा ४५ वर्षे जुना गंभीरा पूल कोसळला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. कोसळलेल्या पुलावर एक टँकर अडकला असून सुमारे पाच ते सहा वाहने नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी सोशल मीडियावर दुर्घटनेचा व्हिडीओ शेअर करत प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले.


त्यांनी म्हटले, "आणंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडणारा मुख्य पूल कोसळला असून अनेक वाहने नदीत कोसळली आहेत. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू करून पर्यायी वाहतूक व्यवस्था उभारावी."


दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले आहे. नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली असून त्यामधील चालक व प्रवाशांचा शोध सुरु आहे.


स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मध्य गुजरातला सौराष्ट्राशी जोडणारा गंभीरा पूल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळला. या अपघातात चार वाहने नदीत पडली असून, आतापर्यंत चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.


राज्य सरकारने तातडीने बचावकार्य सुरू केले असून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे मोठ्या जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे, आणि प्रशासन अधिक जलद गतीने बचावकार्य राबवत आहे.


Comments
Add Comment