
'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेसाठी केल धाडस
मुंबई: स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरू झालेल्या 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर प्रमुख भूमिकेत असून, मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, मालिकेतील एका सीनसाठी अभिनेत्री समृद्धी केळकरने चक्क ४० फूट खोल विहिरीत उडी मारण्याचा धाडसी प्रयोग केला आहे. समृद्धीने या थरारक अनुभवाची माहिती दिली.
'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेतील अतिशय कठीण प्रसंग कृष्णा म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरने आपल्या जिद्दीने पूर्ण केला. कथानकानुसार, जिगरबाज कृष्णाने तिची लाडकी गाय 'स्वाती' हिला वाचवण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला. शेतातल्या विहिरीत स्वाती पडल्याचे कळताच कृष्णाने कोणताही मागचा-पुढचा विचार न करता थेट विहिरीत उडी घेतली.
या अनुभवाविषयी बोलताना समृद्धी म्हणाली, "मला पोहायला येते, पण इतक्या खोल पाण्यात मी कधीही उतरले नव्हते. या सीनबद्दल कळल्यावर तो कसा शूट होणार याची खूप उत्सुकता होती. अखेर शूटचा तो दिवस उजाडला. कोल्हापूरमधील एका शेतातल्या ४० फूट खोल विहिरीत उडी मारण्याचा हा सीन होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एका टेकमध्ये हा सीन पूर्ण करायचा होता. मी कोणताही बॉडी डबल न घेता हा सीन करण्याचे ठरवले."
समृद्धी पुढे म्हणाली, "मी मनाची तयारी केली आणि विहिरीत उडी घेतली. हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. मालिकेच्या संपूर्ण टीमने यासाठी खूप मेहनत घेतली आणि माझी काळजीही घेतली. दोन पट्टीचे पोहणारे माझ्यासोबत विहिरीत होते. मला धाडसी प्रयोग करायला नेहमीच आवडते आणि या सीननंतर माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे, असेच मी म्हणेन."