Wednesday, July 9, 2025

२६/११ हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ!

२६/११ हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ!

नवी दिल्ली: मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.


आज (बुधवार) या प्रकरणाची सुनावणी झाली. विशेष न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी राणाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले असता हा आदेश देण्यात आला. यापूर्वी ६ जून रोजी झालेल्या सुनावणीत त्याची कोठडी ९ जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती.



तहव्वुर राणा हा २६/११ हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमन हेडली उर्फ ​​दाऊद गिलानीचा जवळचा सहकारी आहे. ४ एप्रिल रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाविरुद्धची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले.


२६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत घुसखोरी करत सीएसएसटी रेल्वे स्टेशन, ताज आणि ट्रायडंट या दोन हॉटेल्ससह कामा रुग्णालय आणि एका ज्यू केंद्रावर भीषण हल्ला केला होता. तब्बल ६० तास चाललेल्या या हल्ल्यात १६६ नागरिकांचा बळी गेला होता.


Comments
Add Comment