
नाशिक: ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना नाशिक रोड परिसरामध्ये घडली आहे. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ,नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड, डायना नगर येथे राहणाऱ्या १६ वर्षीय सम्राट भालेराव गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल गेमच्या आहारी गेला होता. सातत्याने घरच्यांनी विरोध केल्यानंतरही तो ऑनलाइन गेम खेळत होता, अखेर सोमवारी रात्री ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्यानंतर त्याला नैराश्य येऊन त्याने राहत्या घरी गळफास घेतला. सकाळी कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून, त्याच्या पश्चात आई आणि दोन लहान बहिणी आहेत. नाशिक रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
दुसरीकडे, कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात ऑनलाइन गेममुळे एका शेतकऱ्याचे ५ लाख रुपये बुडाले. शेतकऱ्याने म्हशी खरेदीसाठी बँक खात्यात ७ लाख रुपये साठवले होते. मात्र, त्यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाने ‘फ्री फायर’ गेम खेळताना अॅप डाउनलोड केले आणि काही क्षणातच खात्यातील ५ लाख रुपये गायब झाले. सायबर पोलिसांनी ट्रान्झेक्शन आयडीच्या आधारे तपास केला. यापूर्वी कोल्हापुरात डिजिटल अरेस्टमुळे साडेतीन कोटी आणि आठ कोटींची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनांमुळे पालकांना मुलांना मोबाईल देताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा मिळाला आहे.