
पोलिसांनी मागील काही तासांत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची धरपकड केली आहे. यात मनसेचा जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचाही समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसेच्या अनेक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. मीरा भाईंदर तसेच वसई विरारमध्ये मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. मनसेच्या राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांना मीरा-भाईंदर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि त्यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या व्यतिरिक्त पोलिसांनी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनाही नोटीस बजावली आहे.
भाषिक वाद, नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका, तसेच तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. गोपनीय माहितीआधारे ही कारवाई होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मोर्चाबाबत मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मनसेच्या नेत्यांनी स्थानिक पोलिसांशी चर्चा करुन नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल असा मार्ग मोर्चा काढण्यासाठी निवडावा. जर तोडगा निघाला तर मोर्चासाठी लगेच परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये एवढी खबरदारी घेणे आवश्यक आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीआधारे कारवाई केली आहे; अस मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मनसेने गर्दीच्या भागातून मोर्चाची परवानगी मागितली. नागरिकांच्या गैरसोयीचा प्राधान्याने विचार करुन पोलिसांनी मोर्चा गर्दीच्या भागातून काढण्यास परवानगी नाकारली आहे. यामुळे मोर्चा आयोजकांनी दुसरा कमी गर्दीचा मार्ग सांगावा. मोर्चाला परवानगी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.