
सरन्यायाधीशांच्या सत्कारावेळी रिकामी खुर्ची, विरोधकांचा बहिष्कार!
मुंबई: विधिमंडळाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आज मंगळवारी (८ जुलै) जोरदार गदारोळाने झाली. एका बाजूला महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा विधानमंडळातर्फे सत्कार होणार असताना, दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामी असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उचलला. यावरून विधानसभा अक्षरशः दणाणून गेली.
भास्कर जाधवांचा आक्षेप: "सरन्यायाधीशांच्या स्वागताला विरोधी पक्षनेता नसेल!"
दिवसाची सुरुवात होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले, "जेव्हा महाराष्ट्र विधानमंडळ महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे स्वागत करेल, तेव्हा विरोधी पक्षनेत्याची जागा मोकळी असेल आणि विरोधी पक्षाला त्यांचे स्वागत करता येणार नाही. आजपर्यंत १० टक्के सदस्य संख्येची अट सांगितली जात होती, पण ती अट कुठेही नाही."
मुख्यमंत्र्यांचे आवाहन आणि अध्यक्षांचा 'लवकरच निर्णय' पवित्रा
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "अभिनंदनाचा प्रस्ताव मांडावा, त्यानंतर आपण चर्चा करू," असे सांगितले. विधानसभा अध्यक्षांनीही, "विधानसभा विरोधी पक्षनेता निवडण्याचा निर्णय हा अध्यक्षांचा आहे. माझ्या दालनात यावर चर्चा झाली आहे. तरीही तुम्ही सभागृहात हा विषय मांडणे योग्य नाही. मी कायदा, प्रथा परंपरा यांचा विचार करून निर्णय घेईन," असे स्पष्ट केले.
"लोकशाहीचा गळा घोटला जातोय!" विरोधकांचा संताप
अध्यक्षांच्या स्पष्टीकरणानंतरही विरोधकांचा संताप कायम होता. भास्कर जाधव यांनी, "आज सरन्यायाधीश येत आहेत, तेव्हा लोकशाहीचा गळा कसा घोटला जात आहे, हे आम्ही दाखवून देऊ," असे आक्रमकपणे म्हटले. जयंत पाटील यांनी अध्यक्षांना, "तुम्ही किती काळ विचार करणार आहात? किती वेळ लागतो?" असे विचारत, "अध्यक्ष म्हणून भूमिका घेण्याची जबाबदारी अध्यक्षांची आहे, पण देवेंद्र फडणवीस तुम्ही ते करू देत नाही," असा थेट आरोप केला.
"आम्ही इथे बसणार नाही!" म्हणत विरोधकांचा सभागृह त्याग करण्याचा निर्णय
यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, "विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची किती दिवस रिकामी ठेवणार आहात? सरन्यायाधीश गवई यांचे आगमन होत आहे, पण या परिस्थितीत आम्ही इथे बसणार नाही. आम्ही सभागृह त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे."
या गदारोळानंतर विरोधी पक्षनेतेपदाच्या रिकाम्या खुर्चीवरून आता राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.