Monday, July 7, 2025

कालबदल सूत्र

कालबदल सूत्र

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर


मानवी कुविचारांच्या कृत्यामुळे कलियुगातील येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी मानवच शक्तिहीन होईल. कालबदल सूत्र यांच्या नियमाप्रमाणे आपण चालत असल्यामुळे पंचतत्त्व संतुलित करणारे सर्व घटक नामशेष करत चाललो आहोत आणि या आपल्या कर्माचे फळ, आपल्याला कलीयुगाचा अंत याच्या रूपात मिळणार आहे. मानवी कालबदल सूत्र ही निसर्गनियमांवर हावी केल्यामुळे सर्व जीवसृष्टी ही नामशेष होणार आणि मग युगप्रवर्तन होणार.


आपण नेहमी म्हणतो की माझे आरोग्य माझ्या हाती तसेच माझे भविष्य सुद्धा माझ्याच हाती आहे. याचे कारण असे की, शारीरिक, मानसिक आणि नैसर्गिक या तिन्ही गोष्टी यात सामावलेल्या आहेत. कदाचित हा लेख कटू वाटेल; परंतु ते सत्य आणि वस्तुस्थिती आहे. आपण शून्यापासून सुरुवात करू. प्राचीन काळापासून ते आतापर्यंत सर्वनाशाची सुरुवात ही कुटुंबातूनच झाली आहे; परंतु तरीही तेव्हाची कुटुंब व्यवस्था ही खूप सुदृढ होती पण वैचारिक शत्रुत्वातून वादापासून ते युद्धापर्यंत सर्वनाश होत गेला. आताच्या काळातील आपण कौटुंबिक परिस्थिती पाहूया. म्हणजे असं की लहानपणी तरी आपण पूर्ण आई-वडिलांवर अवलंबून असतो. आपली खरी सुरुवात तरुण झाल्यावर होते, तेव्हा वेळ येते ती करिअर आणि लग्नाची.


आताच्या काळात कुटुंब व्यवस्था परिपूर्ण नसल्यामुळे फक्त आणि फक्त पैशांच्या गर्दीत अडकून आपण अनेक नाती तोडून टाकण्यास मारक ठरतो. त्यामुळेच आज मुला-मुलींची लग्न होत नाहीत. आधीच्या पिढ्यांमध्ये फक्त तडजोड महत्त्वाची होती आणि त्यामुळे संसार हे टिकून होते. एकत्रित कुटुंबामुळे आपल्या भारतात आपण निसर्ग नियमाप्रमाणे जगत होतो. एकत्रित असल्यामुळे संरक्षण होत होते. आपली संस्कृती आणि संस्कार सांभाळत होतो. आताच्या काळात तसे नसल्यामुळे यांच्या मानसिक अविचारांमुळे येणाऱ्या पिढ्या या स्वतःचं अस्तित्व घडवण्याच्या नादात नातेसंबंध कमी करत एकटे राहण्यास पसंती देत आहेत.


दुसरी गोष्ट आताच्या काळात प्रत्येकाला धनलक्ष्मी पाहिजे कारण आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहावी म्हणून ती गरज आहे. पण हा पैसा खरंच ती पूर्तता करतो का हे फार महत्त्वाचे आहे. मात्र याचा कोणीही विचार करत नाही कारण ही धनलक्ष्मी आपल्या आयुष्यात जास्त असली तरी कमी स्वरूपात तिचं पारडं जड आहे. आता पाहूया निसर्ग नियम. निसर्ग नियमाप्रमाणे एवढे प्रदूषण वाढले आहे की, आता श्वास घेणे शक्य होत नाही. कारण हवेतील ऑक्सिजन दिवसेंदिवस कमी होत जातोय. परिणामी आपल्याला अनेक प्रकारच्या, अनेक शारीरिक व्याधी होत आहेत. आधुनिकतेच्या वळणावर आपण वळण घेतल्यामुळे थोडक्यात आपली बुद्धी भ्रष्ट होत गेली आणि आपण चुकीच्या मार्गावर राहून सुद्धा योग्य मार्गावर आहोत अशी समजूत करून भारतीय संस्कृती आणि संस्कारांचा बळी देत चाललो आहोत. त्यातच भरीसभर म्हणून येणाऱ्या पिढीतील कितीतरी टक्के समाज हा मोबाईलच्या आहारी गेला. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस झाला.


साहजिकच शारीरिक दुष्परिणाम होत जाणार. आधीच शारीरिक कमकुवतपणा आणि त्यात ऑक्सिजनची कमतरता, प्रदूषणाची भीषणता शिवाय अध्यात्मिकतेच्या अभावामुळे कुविचारांना खतपाणी आहेच. आपणच शेखचिल्लीसारखे आपले भविष्य धोक्यात आणत चाललोय. एक सृष्टी संशोधकाच्या रूपाने माझ्या निरीक्षणानुसार या सजीव सृष्टीतील प्रत्येक घटक या निसर्गाला परिपूर्ण आणि सुदृढ करण्याच्या प्रयत्नातच असतो. त्याचे या पृथ्वीवरील कर्म यानुसारच तो पूर्ण आयुष्याचे गणित करतो. निसर्ग नियमाप्रमाणेच जगतो. प्रत्येक घटक जरी अन्नसाखळी असली तरीही मुळात त्याच्यात शत्रुत्व हे नसते. सर्व सद्गुणांनी परिपूर्ण असेच हे घटक आहेत.


वाघ सुद्धा विनाकारण कोणावरही हल्ला करत नाही; परंतु मानव पूर्णपणे त्याविरुद्ध आहे. तो स्वतः सुद्धा निसर्ग नियमाप्रमाणे जगत नाही आणि इतरांनाही जगू देत नाही. मानवाने चुकीच्या दिशेला जाऊ नये म्हणून प्राचीन काळातील ग्रंथांमधून त्याच्यावर संस्कृती आणि संस्कारांचा वर्षाव आपल्या बुद्धिमान ऋषीमुनींनी केला होता; परंतु आज कोणीही अध्यात्मिक नसून आधुनिकतेच्या नावाखाली विध्वंसक वृत्तीचा झाला आहे.


परमेश्वराने निसर्गाच्या परिपूर्ण खजिन्याने ही पृथ्वी बनविली. या पृथ्वीवर सगळ्यात बुद्धिमान प्राणी हा मानव निर्माण केला. खरं तर परमेश्वर खूपच दयाळू आहे. त्याने या सजीव सृष्टीतील प्रत्येक सजीव घटकाला परिपूर्ण पंचतत्त्व संतुलन करूनच ही भूमाता दिली; परंतु मानवी स्वभाव दिवसेंदिवस तिला ओरबाडत राहिला. खरंतर ही भूमी स्वतः परिपूर्ण असल्यामुळे तिचे कार्य करतच असते; परंतु तिच्या कार्यात प्रत्येक वेळेला तिला अडचणीत आणणारा हा मानवच आहे. तिच्या कार्यात सततचा अडथळा आल्यामुळे तिची निसर्गाची घडी ही कायम चुकत चालली आहे. परिणामी निसर्गाचे म्हणजेच या पंचतत्त्वाचे असंतुलन होत आहे.


या सजीव सृष्टीतील इतर घटकांप्रमाणे निसर्ग नियमानुसार जीवन हे फार आवश्यक आहे. कसं आहे मानवाचे कुविचार, त्याचे दुर्गुण हे जर आपल्या पालकांची परिवाराची काळजी घेत नसतील तर या भूमातेची काय घेतील? फक्त मानव श्रीमंतीच्या पोकळ दिखाव्याच्या मागे फक्त पैसा हा घटक महत्त्वाचा समजायला लागला आहे. त्याच्या डोळ्यांवर असणारी ही झापड सगळ्या संस्कारांना तिलांजली देत आहे. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा निसर्गाचा कोप होईल तेव्हा तिथे धर्म, जाती-प्रजाती काहीही पाहिली जाणार नाही. यातून मानवाने काय बोध घ्यायचा तो घ्यावा. या जगातील ज्या व्यक्ती समाजाला योग्य दिशा दाखवतात त्या व्यक्ती म्हणजे संत. आपण आपल्या चुका सुधारणे आता शक्य नाही असे नाही कारण हे जग या संतांच्या भूमीचे ते कोणत्याही धर्माचे कोणत्याही भूमीत राहणारे असो. या संतांमुळेच आज ही भूमी जगते, श्वास घेतेय. कधी विचार केलाय का आपण प्रगतीच्या नावाने एवढे शोध लावलेत.


जे प्राचीन काळातही होते त्याचा शेवट काय झालाय? ही युग परिवर्तन का झाली? थोडा विचार करा तुम्हाला उत्तर मिळेल. परमेश्वराने एवढी बुद्धी देऊन सुद्धा आपण आपल्या हाताने सर्वनाश करत आहोत. या निसर्गातील इतर घटकांचा काय दोष आहे? परंतु आज आपण हे घटक स्वतःच्या स्वार्थासाठी नामशेष केले आहे. भवितव्यात असे होणार आहे की मानवी घटक त्यांच्या कर्मामुळे नातेसंबंध नसल्यामुळे एकांतात आणि एकटेच राहतील. शरीर सुद्धा साथ देणार नाही.


थोडक्यात काय तर जिथे निसर्गसंपत्तीच नाही तर तिथे धनसंपत्ती आणि कुविचार काय कामाचे? परिणामी अनेक व्याधींनी ग्रस्त, त्यात निसर्गाचा कोप या सर्वांना सामोरे जावे लागेल आणि अंततः हे युग संपेल.


आपण आपले पूर्ण जगण्याचे गणितच बदलले आहे. रात्र आणि दिवस हे आपल्यासाठी पूर्णपणे बदलले आहे. एक लक्षात ठेवा 'काळाप्रमाणे' याच्या नावाखाली आपण स्वतः कितीही बदललो तरी ऋतू आणि निसर्ग त्याचे कार्य चोख बजावत असतो. सूर्याला जेव्हा उगवायचे तेव्हाच उगवतो. रात्र जेव्हा व्हायची तेव्हाच होते. आपण आपल्या नियमांमध्ये बदल केला आहे. आपण निसर्ग नियमांची सूत्र जी आपल्या भारतीय संस्कृतीत संस्कारांच्या रूपामध्ये आपल्याला मिळाली होती ती सूत्रच आपण विसरलो किंबहुना ती मिटवली. कारण आपण नवयुगाच्या दिशेने असणारी आपली सूत्र निर्मित केली. परिणाम सर्वच घटकांना भोगावे लागणार.
[email protected]

Comments
Add Comment