
वॉशिंग्टन डीसी: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष 'अमेरिका पार्टी' ची घोषणा केली आहे. या पक्षाच्या कोषाध्यक्षपदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण जबाबदारीमुळे तनेजा आता मस्क यांच्या पक्षाच्या आर्थिक बाबी सांभाळणार आहेत.
कमाईत गुगलचे पिचाई, मायक्रोसॉफ्टचे नाडेलांनाही टाकले मागे!
विशेष म्हणजे, वैभव तनेजा हे सध्या टेस्लाचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) देखील आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी कमाईच्या बाबतीत गुगलचे सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे, हे विशेष.
वैभव तनेजा २०१७ मध्ये टेस्लामध्ये रुजू झाले होते. येथे त्यांनी सहाय्यक कॉर्पोरेट नियंत्रक आणि मुख्य लेखा अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. ते टेस्ला इंडियाचे संचालक असून, भारतातील कंपनीच्या विस्ताराची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.
दिल्ली ते वॉल स्ट्रीटपर्यंतचा प्रवास
दिल्लीत जन्मलेल्या वैभव तनेजा यांनी दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी घेतली. २००० मध्ये ते चार्टर्ड अकाउंटंट झाले. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात प्राइस वॉटर हाऊस कूपर्स (PwC) मधून केली, जिथे त्यांनी भारत आणि अमेरिकेत १७ वर्षे काम केले. त्यानंतर २०१६ मध्ये ते सोलर सिटी कंपनीत रुजू झाले, जी कंपनी नंतर टेस्लाने विकत घेतली.
एलॉन मस्क यांनी शनिवारी सोशल मीडियावरून आपल्या नवीन 'अमेरिका पार्टी'च्या स्थापनेची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अवघ्या काही दिवसांतच एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला इतकी महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने, तनेजा यांचा प्रभाव आणि क्षमता अधोरेखित झाली आहे.