
औषध निर्मितीचा धंदा मात्र जोरात
गणेश पाटील
विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या सातिवली महिला व बालसंगोपन केंद्रात आढळलेले बनावट औषध तयार करणारी कंपनी अस्तित्वातच नसून, कंपनीचा संचालकही नागपूर तुरुंगात आहे. तरीसुद्धा औषध निर्मिती केली जात असून, शासकीय रुग्णालयांना पुरवठा देखील होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून संपूर्ण राज्यात तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, शासकीय रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणारी अनेक औषधे बनावट स्वरूपाची असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये होणाऱ्या औषधांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबविली.
या मोहिमेत वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सातिवली येथील माता व बालसंगोपन केंद्रातून नेण्यात आलेले Tab. cefixime ip २०० mg. हे औषध बनावट असल्याचे मुंबई येथील शासकीय प्रयोगशाळेने स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित औषध रुग्णांना देण्यात येऊ नयेत त्यासोबतच या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पालघर अन्न औषध प्रशासन विभागाच्या चमूने सातिवली माता व बाल संगोपन केंद्रात धाव घेतली.
महानगरपालिकेला औषध पुरवठा करणाऱ्या प्रणिक इंटरप्राईजेसच्या अनिश शेख यांच्यासह इतर पुरवठादारांविरुद्ध वालीव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संबंधित औषध निर्माण करणारी कॅबिज ही मीरा रोड येथील कंपनी अस्तित्वातच नसून, या कंपनीचा संचालक विजय चौधरी हा सुद्धा बनावट औषधांच्या एका प्रकरणात नागपूर कारागृहात आहे. असे असतानाही कॅबिज कंपनीच्या नावाने शासकीय रुग्णालयांना औषधे विकली जात आहेत, याचा तपास आता नागपूर पोलीस करीत आहेत.