
मुंबई: नाशिक महानगरपालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कंत्राटदार पैसे काढून घेत असल्याचा गंभीर आरोप आज विधानसभेत करण्यात आला. आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. गरिबांच्या श्रमावर डल्ला मारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आमदार देवयानी फरांदेंचा आरोप
आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत प्रश्न विचारला की, "नाशिक महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पैशांतून कंत्राटदार पैसे काढून घेत आहेत. काही अधिकारी आणि कंत्राटदार संगनमत करून त्यांच्या पगारातून पैसे घेत आहेत. गरिबांच्या पगारातून पैसे काढण्याचं हे प्रमाण खूप जास्त आहे. यावर सरकार काय आणि कधी कारवाई करणार?"
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश आणि कठोर कारवाईचे संकेत
या गंभीर आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, "नाशिक महापालिकेशी संबंधित या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकशी करतील. यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट केले जाईल."
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, "कंत्राटदार पैसे देत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यापुढे कामगार विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. कामगारांना दिलेले पैसे जर कोणी घेतले, तर तो फौजदारी गुन्हा मानला जाईल. तसेच, सात-आठ वर्षे पीएफ न भरणाऱ्या कंत्राटदारांनाही काळ्या यादीत टाकले जाईल."
या घोषणेमुळे नाशिक महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर गैरव्यवहार करणाऱ्यांवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, हे स्पष्ट झाले आहे.