
वॉशिंग्टन : अमेरिकेत फिरायला गेलेल्या एका हैदराबादी कुटुंबातील आई-वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना अमेरिकेतील ग्रीन काउंटीवरून डलासकडे परत येत असताना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील वेंकट आणि तेजस्विनी आपल्या दोन मुलांसह अमेरिकेत फिरायला गेले होते. यादरम्यान, एका ट्रकने या कुटुंबाच्या कारला जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, कारने लगेचच पेट घेतला. यामुळे चौघांचाही होरपळून जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी मृतदेह फॉरेंसिक तपासणीसाठी पाठवले आहेत. डीएनए चाचणीच्या आधारे मृतांची ओळख पटवून नातेवाईकांना मृतदेह सोपवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, मृतदेह लवकरच भारतात आणले जातील.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे.