
आधी व्यापाऱ्यांचा मोर्चा, आता मनसेचा मोर्चा
ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथे व्यवस्थित मराठी बोलू न शकणाऱ्या काही व्यापाऱ्यांना मारहाण झाली. या घटनेचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांना मोर्चा काढला. नंतर मनसेने मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्याची घोषणा केली. पण या मोर्चासाठी गर्दीच्या भागातील मार्गाची मागणी केली. गर्दीच्या वेळेत मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली तर नागरिकांची गैरसोय होईल त्यामुळे दुसरा एखादा मार्ग सांगा अशी तोंडी विनंती पोलिसांनी केली. पण मनसेचे पदाधिकारी मोर्चा मार्गावर अडून बसले.अखेर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. पोलिसांचा निर्णय आला आणि मीरा भाईंदरमध्ये तणाव वाढण्यास सुरुवात झाली.
आधी पोलीस कारवाई, नंतर मोर्चाला परवानगी
मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई सुरू असल्याचे सांगत पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मनसेच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मनसेशी संबंधित असलेल्या अनेकांना नोटीस बजावण्यात आली. मीरा भाईंदर तसेच वसई विरारमध्ये मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांनी स्थानिक पोलिसांशी चर्चा करुन नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल असा मार्ग मोर्चा काढण्यासाठी निवडावा. जर तोडगा निघाला तर मोर्चासाठी लगेच परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर थोड्याच वेळात पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली आहे, असे मनसेचे अभिजीत पानसे यांनी सांगितले.
मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी मनसे मोर्चा काढत आहे. या मोर्चाला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम होते. हे बघून घाबरून पोलिसांनी मोर्चाला परवनगी दिली, असेही मनसेचे अभिजीत पानसे म्हणाले.