Tuesday, July 8, 2025

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला


मुंबई: राज्यात अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर  या कॅप राउंड १ मध्ये राज्यातील एकूण ९ हजार ४६९ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ७२० इतक्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यानुसार पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्याची अंतिम मुदत सोमवारी, दि.७ जुलैला संपुष्टात आली.  या फेरीमध्ये विविध महाविद्यालयांनी निरनिराळ्या कारणास्तव ६ हजार ४०२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले आहेत.


शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या फेरीनंतर ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये कोट्यांतर्गत ७५ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर नियमित फेरीअंतर्गत ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मात्र राज्यातील महाविद्यालयांनी विविध कारणास्तव काही विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले असल्याची बातमी समोर येत आहे.



प्रवेश नाकारण्याचे कारण


ज्या विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये चुकीची माहिती भरली, जसे की जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र आदी सादर केली नाहीत, तसेच अर्जामध्ये चुकीचे गुण भरल्यामुळे त्यांना कनिष्ठ महाविद्यालयानी प्रवेश नाकारले आहेत.


ज्यामध्ये कोट्यांतर्गत प्रवेशासाठी प्रयत्न केलेल्या २ हजार १९३ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश नाकारले आहेत. त्याखालोखाल विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणारे २ हजार ४९५, तसेच वाणिज्य शाखेसाठी ९५६ आणि कला शाखेसाठी ७५८ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले आहेत. योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी दिली. तसेच पहिल्या फेरीत प्रवेश नाकारण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार असल्याचे देखील त्यांनी पुढे सांगितले. तर अधिक चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी १ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या सर्वाधिक ७८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. त्याखालोखाल कला शाखेत प्रवेश घेतलेल्या ४३१ आणि वाणिज्य शाखेतील ३६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. कोट्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या ३६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत.



अकरावी प्रवेशासाठी राज्यामध्ये किती जागा उपलब्ध?


अकरावी प्रवेशासाठी राज्यामध्ये ९ हजार ४६९ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ७२० इतक्या जागा उपलब्ध आहेत. यातील १६ लाख ७० हजार ५९८ नियमित फेऱ्यांसाठी, तर ४ लाख ५३ हजार १२२ जागा कोट्यांतर्गत प्रवेशासाठी राखीव आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश पहिल्या फेरीत झालेला नाही, त्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी दुसऱ्या फेरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

 

 

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा