Tuesday, July 8, 2025

'विकसित महाराष्ट्र- २०४७' सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे

'विकसित महाराष्ट्र- २०४७' सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभा - विधानपरिषदेत निवेदनाद्वारे आवाहन


मुंबई : राज्य शासनाने १०० दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक ६ मे २०२५ ते दिनांक २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ‘विकसित महाराष्ट्र @२०४७’ करिता 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. 'विकसित महाराष्ट्र- २०४७' सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी ‍विधानसभेतील सर्व सदस्यांनी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभा व विधानपरिषदेत निवेदनाद्वारे केले.


'विकसित महाराष्ट्र २०४७’ चे 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्टे - महाराष्ट्र @२०४७, मध्यमकालीन उद्दिष्टे महाराष्ट्र @७५ व अल्पकालीन उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. ‘विकसित महाराष्ट्र -२०४७’ च्या 'व्हिजन डॉक्युमेंट' चा मसुदा तयार करण्यासाठी क्षेत्रनिहाय १६ गट स्थापन करण्यात आले आहेत. राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशकसुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. ‘विकसित महाराष्ट्र- २०४७’च्या व्हिजनमध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण दिनांक १८ जून, २०२५ ते १७ जुलै, २०२५ या कालावधीत घेण्यात येत आहे.


विधानसभेतील सर्व सदस्यांनी आपल्या समाजमाध्यमांद्वारे, मेळावे, बैठकांमध्ये ‘विकसित महाराष्ट्र - २०४७’ च्या नागरिक सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करावे. तसेच सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य आस्थापनांच्या माध्यमातून नागरिकांना सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्युआर कोड व लिंक वरून सर्वेक्षणात सहभागी होता येईल. सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ बाबत आपली संकल्पना व आकांक्षा याबाबत राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यूआर कोडवरुन व्हॉटस्अप चॅटबॉटद्वारे आपला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा व विधानपरिषदेत केले.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा