
शरद कदम
संत बहिणाबाईंनी हा अभंग लिहून वारकरी संप्रदायाचा कसा विस्तार झाला हे लिहून ठेवले आहे. हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातून हा विचार संत नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत नेला आणि सातशे वर्षांनंतर वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्माचा आवाज २०२५ मध्ये सातासमुद्रा पलीकडे आज इंग्लंडमध्ये आषाढी एकादशीनिमित्ताने घुमू लागला.
चंद्रभागेच्या तीरावरून सुरू झालेला विठ्ठल-रुक्मिणी पादुकांचा प्रवास लंडनमधील थेम्स नदीच्या काठावर विसावला. तोंडाने विठ्ठलनामाचा गजर करत आणि मनात "विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ!" हा भाव ठेवत हजारो वैष्णवांच्या दिंडीची सांगता आज पंढरपुरात झाली. 'वारी' हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि खरा अध्यात्मिक सोहळा. हा वारीचा अनुभव आता सातासमुद्रापार इंग्लंडमधील मराठी कुटुंबामध्ये अनुभवला जात आहे. मराठी माणसं एकवटली जात आहेत आणि त्याला निमित्त आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पादुकांचे....
संतकृपा झाली। इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।।
नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार ।।
जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश ।।
१४ एप्रिल २०२५ रोजी पंढरपुरातील चंद्रभागेच्या काठावरील विठ्ठल मंदिरातून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका लंडनच्या दिशेने निघाल्या होत्या. लंडनमधील विठ्ठल भक्त अनिल खेडकर यांनी २२ देशांतून सत्तर दिवसांत सोळा हजारांहून जास्त किलोमीटरचा रस्ते मार्गे प्रवास करून या पादुका २२ जून रोजी इंग्लंडमध्ये आणल्या आहेत. इंग्लंडमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पहिले भव्य मंदिर बांधण्याचे नियोजन या मंडळींनी केले आहे.
आजचा प्रतिसाद बघता ते मंदिर वेळेत पूर्ण होईल हा आशावाद आज लोकांच्या डोळ्यांमध्ये दिसून आला. ऑगस्टपर्यंत आता या पादुका सगळ्या इंग्लंडभर जिथे जिथे मराठी माणसे आहेत त्या शहरात या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. आषाढीच्या निमित्ताने इंग्लंडमधील सर्व वैष्णवाचा मेळावा आज 'हिथ्रो' विमानतळापासून जवळ असलेल्या स्लाव, (Slough) शहरातील Langley कॉलेजमध्ये भरला होता.

ग्यानबा तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या गजरात, टाळ, मृदंगाच्या तालावर, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या तसबिरी आणि पंढरपूरहून आणलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुका पालखीमध्ये ठेवून मिरवणुकीने याची सुरुवात झाली. ढोल, ताशा, लेझीमच्या तालावर, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, पताका नाचवत ही सगळी मराठी कुटुंबे आपल्या मुलाबाळांसह दिंडीत सामील झाली होती. कुणी फुगड्या घालीत होत्या, तर कुणी बेफाम होऊन ग्यानबा तुकारामाच्या तालावर नाचत होते. इंग्लंडमधील आला खरबंदा जी (डेप्युटी लेफ्टनंट, काउंटी ऑफ बर्कशायर), गुरप्रीत भाटिया, (डेप्युटी लेफ्टनंट, वेस्ट मिडलँड), नील राणा, (डेप्युटी मेयर स्लाव),आदी मंडळी यावेळी दिंडीत सामील होते. कॉलेजच्या सभागृहात पादुकांच्या दर्शनासाठी भली मोठी रांग लागली होती. क्षणभर आपण पंढरपूरच्या देवळाच्या बाहेर आहोत की काय असा भास होत होता.
एका बाजूला दर्शनाची रांग तर दुसऱ्या बाजूने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. अनिल खेडकर यांनी प्रास्ताविक करून सुरुवात केली होती. वारकरी संतांची ओळख करून देणारी 'संतमेळा' ही नृत्य नाटिका यावेळी सादर केली गेली. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
ज्या प्रमाणे देहू-आळंदीहून वारकरी १९ दिवस पंढरपूरला चालत जातात त्याप्रमाणे १९ जूनपासून इंग्लंडमधील तुषार क्षीरसागर, विवेक सूर्यवंशी हे दोघे नॉर्थ वेस्टमधील मँचेस्टरच्या जवळ असलेल्या Warrington पासून अठरा दिवस १८० मैल म्हणजे ३४० किलोमीटरचे अंतर पायी चालून आज या सोहळ्यात सामील झाले.
या दोघांची वारी आज सफल झाली. इथे अनेक मराठी लोकांच्या भेटी झाल्या. मँचेस्टरहून आलेले राहुल लाड म्हणाले असे सण, उत्सव साजरे करण्यामागे 'रूट'शी कनेक्टेड राहण्याचा आमचा प्रयत्न असतो.आम्ही काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून इथे आलो. पण आमची 'मुळं' तिकडे आहेत.
तिथल्या परंपरेशी जोडून राहण्याचा हा प्रयत्न आहे. ती परंपरा ती 'मुळं' आमच्या मुलांपर्यंत पाझरत येतील असा आमचा प्रयत्न असतो. दर्शनानंतर प्रसादाची व्यवस्था होती. पादुकांसमोर सुंदर रांगोळ्या घातल्या होत्या. मराठी माणसांची लगबग सुरू होती. लोकं नटूनथटून आली होती. यावेळी प्रसिद्ध गायक अभेद अभिषेकी यांच्या अभंग गायनाची मेजवानी होती.
१४ एप्रिल रोजी जेव्हा या पादुका पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावरून लंडनच्या दिशेने निघाल्या होत्या त्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या देवळात झालेल्या कार्यक्रमाला मी अनिल खेडकर, संतोष पारकर, भागवत नागरगोजे, सतीश कापशीकर या मित्रांसोबत उपस्थित होतो आणि आषाढीच्या दिवशी लंडनच्या थेम्स नदीच्या जवळ असलेल्या 'स्लाव' शहरात माझ्या मुलासोबत उपस्थित राहाता आले. वारीचे माझं रिंगण पूर्ण झाले.....रामकृष्ण हरी.....!