Friday, October 24, 2025
Happy Diwali

अमेरिका पार्टी!

अमेरिका पार्टी!

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी टोकाचे वैर झालेले एलॉन मस्क यांनी अखेर परवा एका नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. अर्थात जगातील सर्वात श्रीमंत पार्टीची स्थापना झाली. त्यांच्या या पार्टीचे नाव आहे अमेरिका पार्टी. अमेरिकेच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण झालं. विशेषत: आधी त्यांनी लोकांकडून कौल मागवला होता आणि अमेरिकेतील द्विपक्षीय पद्धतीला आव्हान म्हणून तिसरा पक्ष अमेरिकेच्या राजकीय आखाड्यात उतरवणारा निर्णय घेतला. पण मस्क यांच्या नव्या राजकीय पक्षाचे भवितव्य काय? असा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर औत्सुक्याचा ठरतो आहे.

भारतातही अनेक राजकीय पक्ष आले आणि गेले आणि त्यातील काहीच टिकले. बहुपक्षीय लोकशाही असतानाही इथे काहींच्या पक्षाला भविष्य उरले नाही. त्यापैकी एक तर आपण पाहिलेच की, भारतात जनता पक्षाची शकले उडाली आणि त्यातील ‘एक यहा गिरा, एक वहा गिरा’ अशी अवस्था झाली. आज त्या पक्षांचे अस्तित्वही नाही. पण अमेरिकेच्या द्विपक्षीय लोकशाही व्यवस्थेत तिसरा पक्ष सामील होत आहे आणि तो कितपत टिकेल हे अद्याप समजले नाही. कारण अद्याप हा पक्ष आकारास आला नाही. पण मस्क यांनी हे आव्हान स्वीकारले आणि त्यात नव्या पक्षाचे अस्तित्व नुसते टिकवणेच नव्हे, तर यशस्वी होऊन दाखवणे हेही अवघड आव्हान आहे.

मस्क यांच्या नव्या पक्षामुळे त्यांना अमेरिकेतील जनतेत किती लोकप्रियता आहे हे स्पष्ट समजेल. कारण ट्रम्प यांच्या धोरणांमुळे बहुतेक अमेरिकावासी नाराज आहेत. आज अमेरिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि अशा परिस्थितीत अमेरिका एकपक्षीय राजवटीत आहे. जे की लोकशाही नाही तर मस्क यांनी म्हटले आहे की, मी अमेरिकन लोकांना तुमचे स्वातंत्र्य परत द्यायला आलो आहे.

एकेकाळचे जिगरी दोस्त आणि ट्रम्प यांचे जवळचे सहकारी मस्क यांच्यामुळेच यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प जिंकू शकले होते. पण नंतरच्या दिवसांत दोन्ही वरिष्ठांमध्ये वाजले आणि ट्रम्प यांनी मस्क यांना त्यांचा बाडबिस्तारा गुंडाळून व्हाईट हाऊसच्या बाहेर जायला सांगितले. हा अपमान सहन न होऊन मस्क यांनी लगेच दुसऱ्या नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली. अर्थात नवीन पक्ष स्थापन करण्याची धोषणा केली असली तरीही मस्क यांना लगेच निवडणूक रिंगणात उतरता येणार नाही.

कारण त्यांना फेडरल निवडणूक आयोगाकडे आपल्या पक्षाची नोंदणी करावी लागेल आणि मग कदाचित पुढील वर्षी त्यांना निवडणुकीत उतरता येईल. पण त्यांनी ट्रम्प यांना आव्हान दिले आहे हे मात्र नक्की. अर्थात ट्रम्प यांच्यापेक्षा मस्क यांच्यापुढे जास्त अवघड आव्हाने आहे. मस्क यांचा आरोप आहे की, अमेरिकन काँग्रेस देशाला दिवाळखोर बनवत आहे आणि आपण ते उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.

आधुनिक अमेरिकन राजकारणात द्विपक्षीय व्यवस्था आहे आणि तेच अमेरिकन राजकारणाचे ठळक वैशिष्ट्य आहे. पण यापूर्वी कित्येक बिलिनिअर्सनी प्रभावी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण अमेरिकन द्विपक्षीय व्यवस्थेला ते पराभूत करू शकलेले नाही. हाच विश्वास आहे की, ज्यामुळे ट्रम्प यांनी मस्क यांच्या नव्या पक्षाची घोषणा होताच काहीही प्रतिक्रिया दर्शवली नाही. नंतर ते म्हणाले की, मस्क यांनी तिसरा पक्ष स्थापन करणे हे हास्यास्पद आहे.

२०२४ च्या निवडणुकीत मस्क यांनी ३०० दशलक्ष अब्ज डॉलर रिपब्लिकन उमेदवारांवर खर्च केले. ही मदत मस्क यांनी का केली, तर ट्रम्प यांचा पक्ष विजयी व्हावा म्हणून. त्यामुळे नंतर दोन नेत्यांमध्ये जे घडले ते सर्वत्र घडते तसेच घडले आणि उभय नेत्यांमध्ये वितुष्ट आले. पण मस्क यांचा निर्णय अमेरिकेच्या द्विपक्षीय व्यवस्थेला धक्का देणारा आहे, यात काही शंका नाही. कारण इंग्लंड असो, की अमेरिका, तेथे आजवर द्विपक्षीय व्यवस्थाच काम करत होती. क्वचित हा पराभूत व्हायचा किंवा दुसरा सत्तेवर यायचा. पण बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था म्हणजे काय याचा अनुभव आता अमेरिकेला येईल.

आता यापुढील महत्त्वाचा प्रश्न समोर आला आहे तो म्हणजे, मस्क यांच्या नव्या पक्षाचे नेतृत्व कोण करणार. टकर कार्लसन, मार्जोरी टेलर आणि थॉमस मॅसी ही तीन नावे असू शकतील. मुळात हा वाद राजकीय नाहीच, तर श्रेष्ठत्वाचा आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीत प्रचंड कष्ट केले आणि ट्रम्प यांना जिंकून आणले. पण ट्रम्प यांनी त्यांचे उपकार न स्मरता मस्क यांचा पाणउतारा केला आणि त्यांना व्हाईट हाऊस सोडून जायला सांगितल्याची चर्चा आहे. पण काहीही असले तरीही कालचे मित्र आज एकमेकांचे शत्रू झाले, हे मात्र निश्चित.

मस्क यांच्यावर ट्रम्प यांचे विजयी होणे अवलंबून होते, तरीही ट्रम्प यांच्याकडेही काही पॉवर्स आहेत, ज्यामुळे मस्क यांनाही मोठा फटका बसू शकतो. कारण मस्क यांचे व्यवसाय अब्जावधी डॉलर्सच्या कंत्राटावर अवलंबून आहेत. त्यामुळे ट्रम्प जितके अडचणीत आहेत तितकेच मस्कही आहेत. त्यामुळे अमेरिकेला नवीन राजकीय पक्ष मिळाल्याचे समाधान मानावे की भारतासारखेच अमेरिकेसारखेही संपन्न राष्ट्रही अराजकाच्या मार्गाने चालले आहे याबद्दल खेद व्यक्त करावा या द्विधा मन:स्थितीत अमेरिकन जनता सापडली आहे.

आता अमेरिकन राजकारणात एका नव्या खेळाडूची एन्ट्री होत असल्याने आणि तेही मस्क यांच्यासारखा एकेकाळचा ट्रम्प यांचा मित्र असलेला नेता त्यात असल्याने अमेरिकन राजकारणाला नवी दिशा दिली जाईल का, हाच प्रश्न आहे. जग ट्रम्प अधिकाधिक कर लादण्याच्या राजवटीवर अडून बसले असल्याने त्यातच आता या नव्या राजकीय पक्षाची भर पडली आहे. त्यामुळे आणखी काय होणार या चिंतेत जग सापडले आहे.

Comments
Add Comment