जम्मू: पवित्र अमरनाथ यात्राला दि. ३ जुलैपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या ५ दिवसांतच येथे येणाऱ्या भाविकांची संख्या ९३,३३६ वर पोहोचली आहे. दरम्यान सोमवार ७ जुलै हा यात्रेतील सर्वात गर्दीचा दिवस ठरला आहे. दरम्यान, ८,६०५ यात्रेकरूंची सहावी तुकडी सोमवारी जम्मूहून गंदरबलमधील बालटाल आणि पहलगाममधील नुनवान बेस कॅम्पसाठी रवाना झाली. ३८ दिवसांची ही यात्रा पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्गांवरून निघेल. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल. गेल्या वर्षी ही यात्रा ५२ दिवस चालली आणि ५ लाख भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले.
अमरनाथ यात्रेच्या पाचव्या दिवशी २३,८५७ भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. आतापर्यंत एकाच दिवसात दर्शन घेणाऱ्या भाविकांची ही सर्वात मोठी संख्या आहेयात्रेच्या पहिल्या दिवशी, गुरुवारी १२,३४८ यात्रेकरू, शुक्रवारी १४,५१५, शनिवारी २१,१०९ आणि रविवारी २१,५१२ यात्रेकरू दर्शनासाठी आले होते. भेट दिलेल्या यात्रेकरूंमध्ये १७,२५७ पुरुष, ५,२९७ महिला, ३४१ मुले, २९६ साधू, ९ ट्रान्सजेंडर भक्त आणि ६२५ सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे.
अनुकूल हवामान, कार्यक्षम व्यवस्था आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि सुरक्षा संस्थांकडून मिळालेल्या चांगल्या सहाय्यामुळे संख्येत वाढ झाली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, यावर्षी जम्मू विभागात वार्षिक अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्याएकूण १८० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ३ जुलैपासून सुरू झालेली ३८ दिवसांची ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी संपणार आहे.