Tuesday, July 8, 2025

युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू तर ८० हून अधिक जखमी, रशियन मंत्र्याचाही मृत्यू

युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू तर ८० हून अधिक जखमी, रशियन मंत्र्याचाही मृत्यू

कीव : रशियाने युक्रेनवर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये किमान ११ लोकांचा मृत्यू झाला, तर ८० हून अधिक लोक जखमी झाले. या घडामोडींच्या दरम्यान, रशियाचे परिवहन मंत्री, ज्यांना काही तासांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पदावरून हटवले होते, त्यांचा सोमवारी मृत्यू झाल्याच समोर आल. अधिकाऱ्यांनी याला आत्महत्या असल्याच म्हटल आहे.


युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितल की, गेल्या २४ तासांत रशियन हल्ल्यांमध्ये किमान ११ लोक ठार झाले आणि ७ मुलांसह सुमारे ८० लोक जखमी झाले. दरम्यान, रशियाचे परिवहन मंत्री रोमन स्टारोवॉयट सोमवारी (दि.७) मृत अवस्थेत आढळले असून, अधिकाऱ्यांच्या मते त्यांनी आत्महत्या केली असावी. ही बातमी त्या काही तासांनंतर समोर आली, जेव्हा रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालय क्रेमलिनने जाहीर केले की अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी परिवहन प्रमुखांना पदावरून हटवले आहे.


स्टारोव्हॉइट यांना पदावरून हटविण्याची ही कारवाई अशा वेळी झाली, जेव्हा आठवड्याच्या शेवटी युक्रेनकडून ड्रोन हल्ल्याच्या धोक्यामुळे रशियातील विमानतळांवर शेकडो उड्डाणे थांबवण्यात आली होती आणि प्रवासामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, रशियन अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदमुक्तीचे अधिकृत कारण दिलेले नाही.


५३ वर्षीय रोमन स्टारोवॉयट हे मे २०२४ पासून रशियाचे परिवहन मंत्री म्हणून काम पाहिले होते. रशियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पदावरून हकालपट्टी ही कदाचित त्या चौकशीशी संबंधित असू शकते, जी कुर्स्क प्रदेशात बांधकामासाठी दिलेल्या शासकीय निधीच्या अपहारासंदर्भात सुरू आहे. ते या भागाचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते, त्यानंतर त्यांची परिवहन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


तीन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या युद्धानंतर रशियाने अलीकडेच नागरिक वसाहतींवर हवाई हल्ल्यांचे प्रमाण वाढवले आहे. गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर सुमारे १,२७० ड्रोन, ३९ क्षेपणास्त्रे आणि जवळपास १,००० शक्तिशाली ग्लाइड बॉम्ब टाकले, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी(दि. ७) दिली. रशियाची सेना सुमारे १,००० किलोमीटर लांब काही ठिकाणी घुसखोरी करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. रशियाच्या आक्रमणाला रोखण्याचा ताण आणि थेट शांतता चर्चेतील प्रगतीच्या अभावामुळे युक्रेनला अमेरिका आणि युरोपकडून अधिक लष्करी मदत घ्यावी लागली आहे.


--------------


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा