
पुणे : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध भागांतील नागरिकांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी तब्बल २५ लाख किमीचा प्रवास करीत पुणे एसटी विभागाने कोट्यवधींची कमाई केली आहे. गेल्या तीन महिन्यांत (एप्रिल ते जून) विभागाने साडेनऊ लाख प्रवाशांना सुरक्षित गावी पोहोचवले आणि आणले आहे. या सेवेतून एसटीला तब्बल १३ कोटी १४ लाख ८६ हजार उत्पन्न मिळाले असून, ते गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने अधिक आहे.
गेल्या काही वर्षात एसटीच्या ताफ्यात आरामदायी, वातानुकुलित बस दाखल झाल्यामुळे सामान्यांबरोबर सुखवस्तू मध्यमवर्गीय नागरिकही लाल परीकडे वळले आहेत. त्यातच महिला सन्मान, अमृत, ज्येष्ठ नागरिक योजनांमुळे एसटी प्रवाशांची संख्या वाढली आहे.
दरवर्षी उन्हाळी सुट्टयांमध्ये एसटी विभागाकडून नियमित बस गाड्यांसह जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. यंदाही १५ एप्रिल ते जूनदरम्यान पाचशे जादा बसचे नियोजन केले होते. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली. तसेच उत्पन्नही दुप्पट झाल्याचे प्रशासन सांगते.
जानेवारीत एसटीची भाढेवाढ करण्यात आली. यामुळे प्रवासी संख्येवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवासी संख्या कमी होण्याएवजी दुप्पट ते तिपटीने वाढल्याचे दिसते. गतवर्षी २०२४ मध्ये एप्रिल ते जून या उन्हाळी सुट्टी हंगामात २ लाख ८५ हजार प्रवाशांनी प्रवास केला. यंदा २०२५ मध्ये एप्रिल ते जून या सुटीत तब्बल ९ लाख ४३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.
उन्हाळी सुट्टयांमध्ये पुणे जिल्ह्यातून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांसाठी १५ एप्रिलपासून जादा गाड्यांचे नियोजन केले. त्यामध्ये एप्रिल, मे महिन्यात जवळपास सरासरी दोन ते सव्वादोन लाख प्रवासी मिळतील, असा अंदाज होता. एप्रिलमध्ये एसटीला तीन कोटीचे उत्पन्न मिळाले. मे महिन्यात प्रवासी संख्या सर्वाधिक पाच लाख संख्येवर पोहचल्यामुळे एसटीला सर्वाधिक सव्वासात कोटींचे उत्पन्न मिळाले.