ययाती

  17

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे


राजा नहूषला यती, ययाती, संयाती, आयती, नियती व कृती असे सहा पुत्र होते. नहूषाला औटघटकेचे इंद्र पद मिळाल्याने, इंद्र पत्नी शचीशी सहवास करण्याची इच्छा करणाऱ्या नहूषाला ब्राह्मणांनी पदच्युत केले व शापाद्वारे अजगर केले. तेव्हा ययातीने राज्यकारभार स्वीकारला व आपल्या चार भावांना चार दिशांना अधीपती केले.
एकदा दानवराज वृषपर्वाची कन्या शर्मिष्ठा व शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आपल्या मैत्रिणींसह वनात विहार करीत होत्या. सरोवरात स्नान केल्यानंतर बाहेर आल्यानंतर चुकून गडबडीत देवयानीने शर्मिष्ठेची वस्त्रे परिधान केली. ते पाहून शर्मिष्ठेला राग आला व तिने अपशब्दाने देवयानीला अपमान केला व रागाने देवयानीच्या अंगावरील वस्त्र ओढून तिला विहिरीत ढकलून दिले व मैत्रीणींसह राजवाड्यात परत गेली.


त्याचवेळी वनात शिकारीसाठी आलेला व तहानलेला राजा ययाती पाण्याच्या आशेने विहिरीजवळ आला. मात्र विहिरीत पाण्याऐवजी विवस्त्र देवयानीला पाहून त्याने आपला शेला तीला नेसण्यास दिला व हात देऊन बाहेर काढले. दोघेही एकमेकांकडे आकृष्ट झाले. देवयानीने घरी जावून शुक्राचार्यांना घडलेला प्रसंग कथन केला. तेव्हा शुक्राचार्यांनी वृषपर्वाच्या राज्याचा त्याग करण्याचे ठरविले व देवयानीसह बाहेर पडले.


वृषपर्वाला हे वर्तमान कळताच शुक्राचार्य शत्रूंना जाऊन मिळतील या भीतीने तो त्यांच्याकडे जाऊन त्यांची मनधरणी करू लागला; परंतु शर्मिष्ठेने देवयानीचा अपमान केलेला असल्याने देवयानीची इच्छा असेल त्याप्रमाणेच मी वागेन असे शुक्राचार्यानी सांगितले. तेव्हा वृषपर्वा देवयानीकडे जाऊन मनधरणी करू लागला. तेव्हा मी जेथे जाईल तेथे शर्मिष्ठेने माझी दासी होऊन सेवा करावी अशी अट घातली. वृषपर्वाने ती अट मान्य केली.


देवयानीला देवगुरू बृहस्पतीचा पुत्र कच याने “तुझ्याशी कोणताही ब्राह्मण पुत्र विवाह करणार नाही’’ असा शाप दिला होता. म्हणून शुक्राचार्यांनी देवयानीचा विवाह ययातीसोबत लावून दिला. ठरलेल्या अटीप्रमाणे शर्मिष्ठा तिच्या सेवेत दासी म्हणून राहू लागली. शुक्राचार्यांनी ययातीला देवयानीशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला दिला. कालांतराने देवयानीला यदू व तूर्वसु नामक दोन पुत्र झाले. दरम्यानच्या काळात शर्मिष्ठा व ययाती एकमेकांच्या संपर्कात आली.


त्यामुळे शर्मिष्ठेला द्रुह्यू अनू व पूरू असे तीन पुत्र झाले. देवयानीला ही गोष्ट कळताच ती रागाने पित्याकडे गेली व सर्व हकीकत सांगितली. ययातीने आपले म्हणणे न ऐकता स्त्रीलंपटपणा करून विश्वासघात केल्याचा राग घेऊन शुक्राचार्यांनी ययातीला वृद्ध व कुरूप होण्याचा शाप दिला. शापाच्या प्रभावाने वृद्ध झाला तरी ययातीचे सुखलोलूप मन अस्वस्थ होते. त्याने शुक्राचार्यांची क्षमा मागून तरुणपण परत देण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीने मन द्रवलेले शुक्राचार्य म्हणाले जर तुला कोणी तुझे वृद्धत्व घेऊन आपले तारुण्य देईल, तर तू त्याचे तारुण्य उपभोगू शकशील असा उ:शाप दिला.


ययातीने यदु, तुर्वसू ,द्रुह्यू, अनु आदी सर्वांना विचारले. मात्र कोणीही आपले तारुण्य देण्यास तयार नव्हता. अखेर ययातीने पुरूला विचारले पुरूने पित्याच्या वृद्धत्वाच्या बदल्यात आपले तारुण्य देण्याचे मान्य केले. ययातीने त्याचे तारुण्य घेऊन अनेक वर्षे इंद्रियसुख उपभोगले. अशा प्रकारे अनेक वर्षे सुख उपभोगून जेव्हा त्याचे मनात वैराग्य उत्पन्न झाले, तेव्हा त्याने पुरूला त्याचे तारुण्य परत देऊन आपले वृद्धत्व घेतले. शेवटी पुरूला राज्याभिषेक करून व अन्य मुलांना विविध दिशेला राज्य देऊन स्वतः वनप्रस्थानाला निघून गेला.

Comments
Add Comment

नाटककार जयवंत दळवी

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर जयवंत दळवींना ‘साहित्यिक’ ओळख मिळण्याआधीची पंधरा-सोळा वर्षे वेंगुर्ल्यातील आरवली

आषाढी एकादशीनिमित्त...

सुंदर ते ध्यान : समतेची प्रेरणा ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल... आषाढ सुरू होताच अवघ्या महाराष्ट्राला पंढरपूरच्या

‘जिथे शब्द थांबतात तिथे गुरू बोलतो...’

ऋतुजा केळकर आयुष्याच्या पहिल्या क्षणी, जेव्हा मी रडत या जगात आले, तेव्हा जिने मला कुशीत घेऊन शांत केलं, तीच माझी

आधुनिक काळातील ‘पिठोरा चित्रकला’

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीविषयी अनेक दिवस लेख लिहीत आहे. यामध्ये पूर्वी मधुबनी चित्रशैली आणि वारली

तुलना

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजच्या जागतिकीकरणाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात आपण जितके एकमेकांशी जोडलेले आहोत,

दर्शन पांडुरंगाचे

स्नेहधारा : पूनम राणे सकाळचे ९ वाजले होते. सुदेश घाईघाईने कामानिमित्त मुलाखत द्यायला निघाला होता. तिथूनच तो