सूर्य गोलच का दिसतो?

  13

कथा : प्रा. देवबा पाटील


आता तो हुशार मुलगा सुभाषही आदित्यसोबत व त्याच्या मित्रांबरोबर दररोज दुपारी शाळेच्या मधल्या सुट्टीत निंबाच्या झाडाखाली यायचा. हे त्याला आपल्या डब्यातील थोडी-थोडी पोळीभाजी द्यायचे, असे डबे खात असताना त्यांची सूर्याविषयी चर्चा चालायची.


“सूर्याची प्रभा म्हणजे काय असते?” चिंटूने प्रश्न केला.


“सुभाष म्हणाला, सूर्य हा अतिशय तप्त वायूंपासून बनलेला आहे. या वायूंचे चार थर असतात. त्यांपैकी सर्वांत बाहेरचा जो गोलाकार थर आहे त्यालाच सूर्याची प्रभा किंवा सूर्याचे प्रभामंडळ म्हणतात. तो प्रकाश आणि वायूंनी बनलेला असतो. या बाह्य थराचेही वर्तुळाकार असे आणखी दोन भाग असतात. त्याचा आतील भाग फिकट पिवळा असून बाहेरील भाग हा पांढरा असतो आणि तो सूर्याच्या कडेपासून लाखो मैल दूरपर्यंत पसरलेला असतो. पृथ्वीवरून आपणास दुर्बिणीद्वारे सूर्याची किरीट, वर्णगोल व दीप्तगोल अशी तीन आवरणे दिसतात.”


“हे किरीट, वर्णगोल व दीप्तगोल म्हणजे ही काय भानगड आहे गड्या?” चिंटूने विचारले.


“पृथ्वीवरून दिसणा­ऱ्या सूर्याच्या पृष्ठभागाला दीप्तगोल किंवा दीप्तीगोल म्हणतात. त्यावर किंचितसे गुलाबी रंगाचे आवरण दिसते त्याला वर्णगोल म्हणतात नि त्यावर जे अतिशय विस्तारलेले पिवळसर प्रभामंडल म्हणजे प्रकाशवलय दिसते त्याला किरीट म्हणतात. हा किरीट बाह्य दिशेने प्रवाहरूपात वाहतो नि ग्रहांच्याही पलीकडे पोहोचतो. हाच प्रकाश आपल्या पृथ्वीवर पोहोचतो. सूर्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास सव्वाआठ मिनिटे लागतात.” सुभाषने या मुलांचे खुलासेवार शंका निरसन केले.


“सांग बरे मग गड्या आपला सूर्य गोलच का दिसतो?” चिंटूने विचारले.


“अरे हो, तो त्रिकोणी, चौकोनी, षट्कोनी का नाही दिसत?” पिंटूनेही त्या शंकेला जोडून प्रश्न केला.


“खरंच गड्या तो अनियमित आकाराचा वा वेडावाकडा का नाही दिसत?” मोंटूने त्या प्रश्नात भर घातली.


सुभाष सांगू लागला, “ कोणत्याही गोल आकाराच्या वस्तूच्या केंद्रापासून त्याच्या विशिष्ट त्रिज्येच्या परिघावरील सर्व अणू-रेणूंमध्ये कार्य करणारे आकर्षण बल हे समान प्रमाणामध्ये असते. त्यामुळे गोलाकार हा सर्वांत जास्त पृष्ठीय ताण सहन करणारा असतो; परंतु इतर प्रकारच्या आकारांमध्ये मात्र त्यांच्या वेगवेगळ्या आकारांमुळे या बलात थोडा-फार फरक झालेला दिसतो. तसेच प्रत्येक वस्तू ही तिच्या सगळ्याच अणू-रेणूंना आपल्या केंद्राकडे ओढत असते. गोलाकारात हे आकर्षण सर्व दिशांनी समसमान असते. त्यामुळे सूर्य गोलच राहतो. तसेच या अवकाशात सूर्यसुद्धा स्वत:भोवती सदोदित फिरत असतो म्हणून तोही फिरून फिरून वर्तुळाकार म्हणजे गोलाकार झाला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक तारा नेहमी कमीत कमी ऊर्जेत जास्तीत जास्त स्थिरता मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. स्थिरत्वाची ही स्थिती तो तारा गोलाकार स्थितीमध्ये असला तरच येते. म्हणून सूर्य गोलच असतो.”


“मी असे ऐकले आहे की, कोणत्या तरी देशात रात्रीही सूर्य दिसतो म्हणतात. त्याचे काय कारण असावे?” पिंटूने शंका काढली.


“हो. खरे आहे ते.” सुभाष म्हणाला, “नॉर्वे या देशामध्ये मध्यरात्रीही सूर्य दिसतो म्हणून त्या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हणतात. नॉर्वे हा देश उत्तर ध्रुवाजवळ येतो. या ध्रुवावर २१ मार्चला सूर्य उगवतो आणि २३ सप्टेंबरला मावळतो. त्यामुळे या कालावधीत नॉर्वेमध्ये रात्रीसुद्धा संधिप्रकाशासारखा उजेड असतो. या देशाच्या अति उत्तरेकडील भागात तर जून-जुलै दरम्यान २४ तासांचा दिवस असतो. त्यावेळी तेथे सूर्य पूर्णपणे असा मावळतच नाही. त्यामुळे तेथे मध्यरात्रीही सूर्य दिसू शकतो. पृथ्वीचा गोल आकार, कलता आस व सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन या कारणांमुळे ही घटना घडते.”
आजही शाळेची मधली सुट्टी संपली व ते सारे मित्र आपापल्या वर्गाकडे जाण्यासाठी उभे राहिले.

Comments
Add Comment

नाटककार जयवंत दळवी

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर जयवंत दळवींना ‘साहित्यिक’ ओळख मिळण्याआधीची पंधरा-सोळा वर्षे वेंगुर्ल्यातील आरवली

आषाढी एकादशीनिमित्त...

सुंदर ते ध्यान : समतेची प्रेरणा ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल... आषाढ सुरू होताच अवघ्या महाराष्ट्राला पंढरपूरच्या

‘जिथे शब्द थांबतात तिथे गुरू बोलतो...’

ऋतुजा केळकर आयुष्याच्या पहिल्या क्षणी, जेव्हा मी रडत या जगात आले, तेव्हा जिने मला कुशीत घेऊन शांत केलं, तीच माझी

ययाती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे राजा नहूषला यती, ययाती, संयाती, आयती, नियती व कृती असे सहा पुत्र होते. नहूषाला

आधुनिक काळातील ‘पिठोरा चित्रकला’

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीविषयी अनेक दिवस लेख लिहीत आहे. यामध्ये पूर्वी मधुबनी चित्रशैली आणि वारली

तुलना

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजच्या जागतिकीकरणाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात आपण जितके एकमेकांशी जोडलेले आहोत,