‘जिथे शब्द थांबतात तिथे गुरू बोलतो...’

  17

ऋतुजा केळकर


आयुष्याच्या पहिल्या क्षणी, जेव्हा मी रडत या जगात आले, तेव्हा जिने मला कुशीत घेऊन शांत केलं, तीच माझी पहिली गुरू आहे आणि ती म्हणजे माझी आई. तिने मला चालायला शिकवलं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, पडल्यानंतर उभं राहायला शिकवलं. तिने मला अन्न दिलं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे “कसे जगायचं” हे प्रेमाने, धीराने आणि उदाहरणाने शिकवलं.


आईच्या स्पर्शात ममता होती, पण तिच्या नजरेत शिकवण होती जी मनाच्या अगदी खोल कप्प्यांत रुजली. आईने उच्चारल्याशिवायच शिकवलेले शब्द, हेच माझ्या जीवनातल्या पहिल्या पाठशाळेचे पहिले धडे होते.


गुरुपौर्णिमा निमित्त गुरू या शब्दाला उलगडून पाहिले तेव्हा लक्षात आले की, ‘गुरू’चार अक्षरांचा हा शब्द, पण त्यात संपूर्ण जीवनाचा अर्थ सामावलेला आहे. गुरू म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एक अवस्था आहे. जिथे अंधार संपतो आणि प्रकाश सुरू होतो. तिथे गुरूचे अस्तित्व सुरू होते. ‘ग’ म्हणजे ‘गाथा’. गाथा ज्ञानाची, करुणेची आणि प्रेरणेची. गुरू आपल्या अनुभवांनी एक अशी गाथा रचतो, जी ऐकून नव्हे, तर जगून समजते. गुरू आपल्या अनुभवांनी एक अशी कथा विणतो, जी केवळ कानांनी ऐकली जात नाही, तर मनाने उमगली जाते, जी जीवाने अनुभवून जीवनात उतरवली जाते.


‘गुरू’मधील पुढील अक्षर म्हणजे ‘उ’. ‘उ’ म्हणजे ‘उदात्तता’ विचारांची, भावनांची आणि वृत्तीची. तो केवळ शिकवत नाही, तो स्वतःच्या आचरणातून जिवंत शिकवण देतो. पण गुरू फक्त शिकवण देणारा नसतो असे नाही तर आपल्या मनाची, शब्दांची आणि कृत्यांची शुद्धता जशी असते तशीच उदात्तता तो प्रत्येक शिष्याच्या मनात रुजवतो. तो केवळ पुस्तकी ज्ञान देऊन पुढे जात नाही तर त्याच्या वागण्यात, त्याच्या आचरणात, त्याच्या जीवनशैलीत अशी प्रेरणा रुजवतो, जी शब्दांपेक्षा खोलवर मनाला भिडते आणि काळाच्या परीक्षेत टिकून राहते. म्हणूनच ती शब्दांपेक्षा अधिक प्रभावी, अधिक गाढ आणि अधिक दीर्घकालीन असते.


‘गुरू’मधील पुढील अक्षर म्हणजे ‘रू’ ‘रू’ म्हणजे ‘रुजवणं’ योग्य मूल्यांची, दिशेची आणि खऱ्या माणुसकीची. गुरू केवळ ज्ञान देत नाही, तर तो मनाच्या अंगणात नैतिकतेचे, प्रेमाचे आणि सहिष्णुतेचे बीज रुजवतो. त्या बीजातूनच माणूसपणाची खरी शिकवण फुलते, जी आयुष्यभर साथ देते आणि समाजाला उजळवते.
म्हणूनच ‘गुरू’ या चार अक्षरांच्या सावलीत जेव्हा आपण उभे राहतो,


तेव्हा आपल्याला कळते की, सृष्टीच्या पहिल्या प्रकाशकणाचा शोध घेत असताना, मानवाने सर्वांत आधी जिची अनुभूती घेतली, ती म्हणजे अज्ञान. हा अंधार शाब्दिक नव्हता; तो आत्म्याचा, मनाचा आणि अंतःकरणाचा होता आणि या अंधाराला दिशा दाखवणारा पहिला दीप ज्याने प्रज्वलित केला, तोच खरा गुरू. त्याच दिवशी, ज्या दिवशी अज्ञानाचा काळिमा पुसला गेला.


आणि ज्ञानाच्या चांदण्यात माणसाने पहिले स्नान केले तोच हा दिवस तीच ही गुरुपौर्णिमा.
भारतीय संस्कृतीत गुरू हा केवळ एक शिक्षक नाही, तर तो आहे जीवनाचा दीपस्तंभ. जो अध्यात्मिक उन्नतीला दिशा देतो, व्यावसायिक यशाचा आधार बनतो आणि दैनंदिन जीवनाच्या संघर्षात धैर्याची आणि संस्कारांची शिकवण देतो. गुरू म्हणजे तो दीपाचा प्रकाश, जो आपल्या अंतर्मनातील अंधकार दूर करतो. जणू घनदाट अंधारात पहिला किरण उगवतो. जो आपल्याला केवळ ज्ञान नाही, तर जीवनाचा अर्थ शिकवतो. अध्यात्मिक दृष्टीने तो आत्म्याच्या शोधाचा मार्ग दाखवतो. कारण जिथे मनाची शुद्धी, भावनेची उंची आणि विवेकाची प्रखरता एकत्र येते तेथे गुरू असतो. व्यवसायात, गुरू त्या अनुभवाच्या नदीत आपल्याला मार्गदर्शन करतो, तो शिकवतो की यश म्हणजे फक्त नफा नाही, तर प्रामाणिकपणा, धैर्य आणि सतत सुधारणा आहे. तो शिकवतो की कसे अडचणींना सामोरे जावे, कसे सुसंध्यांनाना ओळखावे आणि कके परिश्रमांतून स्वतःला मोठे करावे. दैनंदिन जीवनात गुरू हे आपले सर्वांत जवळचे साथीदार असतात जे आपल्या सुख-दु:खात, यश-अपयशात, स्वप्न-आशांमध्ये सहभागी असतात. जे आपल्या मनात योग्य मूल्य रुजवतात, कर्तव्यांची जाणीव करून देतात आणि माणुसकीची खरी ओळख करून देतात.


गुरू परंपरा म्हणजे केवळ एक काल्पनिक आख्यायिका नाही तर तो एक जिवंत प्रवाह आहे जो आपल्या मनाला, विचारांना आणि कृतींना सदैव नवचैतन्य देतो. यामुळेच आपली जीवनशैली, आपले संस्कार, आपले ध्येय एकंदरच ज्यांच्या आधारावर आपलं व्यक्तिमत्त्व सजतं, वाढतं आणि समाजाला नव्याने आकार देतं. भारतीय संस्कृतीमध्ये गुरू हे केवळ शिकवणारे नसून ते जीवनाचे दिशादर्शक मानले गेले आहेत.


या परंपरेची सुरुवात आदियोगी भगवान शंकरापासून झाली, ज्यांनी सप्तऋषींना ज्ञानदान केले. यानंतर महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे वर्गीकरण करून ज्ञानाला निश्चित रूप दिलं, म्हणूनच त्यांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. योग, वेद, तत्त्वज्ञान, भक्ती आणि विज्ञान या सगळ्या क्षेत्रांत गुरूंनी आपापल्या शिष्यांना फक्त ज्ञानच दिलं नाही, तर विचारांचा दृष्टिकोनही दिला. या परंपरेतून पुढे आले गौतम बुद्ध ज्यांनी आत्मज्ञानाचा दीप पेटवला आणि गुरू नानक ज्यांनी समतेचा संदेश दिला. आज हे सारे गुरु आणि त्यांची शिकवण आपल्या जीवनाच्या वाटचालीत मार्गदर्शक ठरतात जणू एका हातात ज्ञानाचा दीप आणि दुसऱ्या हातात अनुभवाची तलवार घेऊन ते आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतात. अगदी माझ्या शब्दात सांगायचे झाले तर,



एकेन हस्ते दीपं धारयन्
ज्ञानरूपकं शुभम्।
द्वितीयेन अनुभवं शस्त्रं च
अज्ञानार्णव-नाशकम्॥
गुरुः पन्थानं प्रदर्शयेत्
प्रकाशस्य सत्यमार्गगः।
नयेत् तमसतः तेजसि,
करुणया सततं सदा॥


Comments
Add Comment

नाटककार जयवंत दळवी

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर जयवंत दळवींना ‘साहित्यिक’ ओळख मिळण्याआधीची पंधरा-सोळा वर्षे वेंगुर्ल्यातील आरवली

आषाढी एकादशीनिमित्त...

सुंदर ते ध्यान : समतेची प्रेरणा ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल... आषाढ सुरू होताच अवघ्या महाराष्ट्राला पंढरपूरच्या

ययाती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे राजा नहूषला यती, ययाती, संयाती, आयती, नियती व कृती असे सहा पुत्र होते. नहूषाला

आधुनिक काळातील ‘पिठोरा चित्रकला’

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीविषयी अनेक दिवस लेख लिहीत आहे. यामध्ये पूर्वी मधुबनी चित्रशैली आणि वारली

तुलना

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजच्या जागतिकीकरणाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात आपण जितके एकमेकांशी जोडलेले आहोत,

दर्शन पांडुरंगाचे

स्नेहधारा : पूनम राणे सकाळचे ९ वाजले होते. सुदेश घाईघाईने कामानिमित्त मुलाखत द्यायला निघाला होता. तिथूनच तो