दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
सध्या भारतात डिजिटल क्रांती आहे. पैशांपासून ते वस्तूंपर्यंत अनेक व्यवहार हे डिजिटल माध्यमातून होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबवल्या. यातील एका योजनेचा तिने लाभ घेतला आणि भांडवल उभारले. दुसऱ्या योजनेचा लाभ घेऊन शासकीय ऑर्डर मिळवल्या आणि उद्योजिका म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं. ही उद्योजिका म्हणजे अरुलमोळी सर्वनन.
अरुलमोळी तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील उसिलमपट्टी शहराजवळील एका लहान गावात वाढली. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे ती बारावीच्या पुढे शिक्षण घेऊ शकली नाही. वयाच्या १९ व्या वर्षी तिचे लग्न झाले. त्यानंतर ती एका मुलीची आई झाली. अरुलमोळीचे कुटुंब मदुराई शहरात स्थायिक झाले. तिच्या मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी, अरुलमोळीने एका उद्योजकीय प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला; परंतु नोकरी शोधली नाही. कारण तिला वाटले की तिला नोकरी मिळाली तर ती तिच्या मुलांना वेळ देऊ शकणार नाही.
कामासाठी बाहेर न जाता आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालण्याची ती संधी शोधत होती. तेव्हाच तिला जेम (GeM)- एक सरकारी ई-मार्केटप्लेस जिथे सामान्य उद्योजकांच्या वस्तू आणि सेवा खरेदी केल्या जातात त्याबद्दल कळले. तिने ऑफिस उत्पादने पुरवण्यासाठी जेमवर नोंदणी केली. भांडवल उभारणीसाठी तिने स्वतःचे दागिने ४०,००० रुपयांना गहाण ठेवले आणि हळूहळू उत्पादने खरेदी करण्यास सुरुवात केली. जेमवर नोंदणी करणे हे फक्त पहिले पाऊल होते.
जेमवर नोंदणी केल्यानंतर दोन महिने तिला कोणतीही ऑर्डर मिळाली नाही. पण तिने हार मानली नाही. अखेर तिचा संयम फळाला आला. तिला २४३ रुपयांच्या १० स्टॅम्प पॅडची पहिली ऑर्डर मिळाली. तिचा उत्साह दुणावला. तिने उत्पादनांची यादी वाढवण्याचा विचार केला. त्यासाठी आणखी भांडवलाची गरज होती. तिने प्रकल्प अहवाल तयार केला. त्यानंतर केंद्र सरकारच्या मुद्रा योजना योजनेअंतर्गत ५०,००० रुपयांचे कर्ज घेण्यासाठी बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर तिने घाऊक बाजारपेठेतून उत्पादने मिळविण्यासाठी नवीन निधीचा वापर केला. स्टेशनरी आणि ऑफिसच्या साहित्याची ती काळजीपूर्वक निवड करत असे.
हाच व्यवसाय करण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे या व्यवसायात नाशवंत वस्तूंपेक्षा कमी जोखीम असते. तसेच, मुलांच्या शिक्षणाचा एक छोटासा भाग असल्याने शाळांना उत्पादने पुरवणे तिला चांगले वाटले. अरुलमोळी वेबसाइटवर उत्पादनांची माहिती अपलोड करते.
ऑर्डर आल्याप्रमाणे पुरवठा करते. तिला मदत करण्यासाठी तिने तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांना नियुक्त केले आहे. ती खरेदी आणि पॅकिंगपासून ते डिलिव्हरीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख करते. ती डिलिव्हरीसाठी इंडिया पोस्टचा वापर करते. तिच्या मते इंडिया पोस्ट अतिशय कार्यक्षम आहेत आणि देशाच्या अगदी दुर्गम भागातही पोहोचू शकतात. तिने अलीकडेच लेहला ऑर्डर पाठवली आहे.
दरम्यान अरुलमोळीला पंतप्रधान कार्यालयाला १,६०० रुपयांच्या थर्मॉस फ्लास्कची आवश्यकता असल्याची माहिती मिळाली. तिने त्या ऑर्डरसोबत पंतप्रधानांचे आभार व्यक्त करणारे पत्र पाठवले.
पत्रात तिने जेम आणि मुद्रा योजनासारख्या सरकारी योजनांनी तिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास आणि तिच्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालण्यास कशी मदत केली आहे हे सविस्तर लिहिले. पंतप्रधानांनी २०१७ मध्ये त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात अरुलमोळीच्या यशोगाथेचा उल्लेख केला. तिला पंतप्रधान कार्यालयाकडून तिची माहिती विचारण्यासाठी फोन येईपर्यंत काहीच कल्पना नव्हती. नंतर तिने वर्तमानपत्रात ‘मन की बात’ची तमिळ आवृत्ती वाचली आणि ती खूप रोमांचित झाली.
या कार्यक्रमानंतर अरुलमोळीला आणखी २,७४,००० रुपयांची ऑर्डर मिळाली. जे पूर्ण करणे कठीण होते. तिने सुमारे ५० उत्पादने स्वतंत्रपणे खरेदी केली. वस्तू पॅक केल्या आणि त्यानंतर डिलिव्हर देखील केल्या. या वस्तू सुरक्षितपणे पोहोचतील की नाही याची तिला भीती वाटत होती. पण त्या वस्तू पोहोचल्या आणि तिला वेळेवर पैसे देखील मिळाले. तिने पंतप्रधानांना पुन्हा पत्र लिहिले आणि त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलाबद्दल त्यांना माहिती दिली. तिच्या उद्योगाची उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. अरुलमोळीचा भविष्यात कार्यालयीन उपयोगाच्या वस्तू तयार करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट उघडण्याचा विचार आहे.
जर तुमच्याकडे व्यवसायाची कल्पना असेल पण आवश्यक पैसे नसतील, तर आशा सोडू नका. विविध योजनांतर्गत कर्जासाठी अर्ज करा. जर तुमचा प्रकल्प व्यवहार्य असेल तर तुम्हाला तो नक्कीच मिळेल. जर तुम्ही बुद्धिमान, प्रामाणिक आणि कठोर परिश्रम करण्यास तयार असाल तर आकाशच मर्यादा आहे, असे ती म्हणते.
अरुलमोळीचे आयुष्य आता अधिक समृद्ध झाले आहे. पूर्वी त्या शेगडीवर स्वयंपाक करत असत, आज त्या गॅस स्टोव्हवर अन्न बनवतात. पूर्वी घराचं छप्पर गळत होतं, आज त्या स्वतःच्या हक्काचं घर घेण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत आहेत.
अरुलमोळी सरवनन यांची जीवनगाथा ही महिलांच्या सक्षमीकरणाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यांचे यश केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नाही, तर त्यांनी हजारो महिलांना स्वप्न पाहण्याचं आणि ते पूर्ण करण्याचं बळ दिलं आहे.