Sunday, July 6, 2025

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल...

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल...

माेरपीस : पूजा काळे 


वैशाखी वणव्याने तापून निघालेल्या धरित्रीला जशी मृगाची ओढ त्याप्रमाणं, चातुर्मासाच्या प्रारंभापासूनचं वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागतात. पंढरीची वारी म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सण. याचे कारण, एकदा जो वारीला जातो, त्याचे पाय दरवर्षी आपोआपचं वारीला लागतात. या वारीपुढे सर्व तीर्थयात्रा फिक्या पडतात. माझी माय पंढरीची माऊली विठ्ठल आहे. तो लेकराच्या अंतःकरणातील भाव ओळखतो, पूर्णत्वास नेतो. तुमच्या पाठी अनेक जन्माच्या, पुण्याच्या राशी असतील, तुम्ही काही पुण्य कर्म केले असेल, तरच त्या मनुष्यास पंढरीची वारी घडते; असा समज आहे. आयुष्यात एकदा तरी वारी घडावी हा प्रत्येक वारकऱ्याच्या मनातला सहजभाव असतो आणि तो फलद्रूप होतो.


वारी म्हणजे प्राण. प्रत्येक वारीतला सहभाग हा आयुष्याला मिळालेलं वरदान असतं आणि शेवटी साक्षात विठ्ठलचरणाशी लीनता म्हणजे तादात्म्य पावणं. अध्यात्मिक भाषेत जीवा शिवाशी एकरूप होणं. ही एकरूपता ज्याला गवसते तो पूर्णत्वास जातो.


नाम दर्शनाची पहिली पायरी,
पुंडलिका भेटी श्रद्धा भावभोळी.
वैष्णवांचा मेळा चंद्रभागे तीरी,
काकड भूपाळी तेज प्रभावळी.
पांडुरंग घोष रिंगण सोहळा,
जाणीव नेणिव भाग्य आले फळा.
आसमंत हरी रंगे भगव्यात,
माऊलीने द्यावा दृष्टांत सकळा


अशी अवस्था वारकऱ्यांची होते. राज्यभरातील वारकरी लाखोंच्या संख्येने ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांच्या पालखीत तल्लीन होतात ना, तेव्हा दुःखाचं गारुड दूर होतं. अंतरंगातली क्लिमिष नाहीशी होतात. कटुता दूर सारली जाते. त्यावेळी माऊलींच्या साक्षात्काराची प्रचिती येते. ही माऊली कशी आहे तर,


सुवर्ण मुकुट, चंदन कपाळी.
साऱ्या जग चिंता, जगास सांभाळी.
मत्स्य कर्णफुल, वाढविती शान.
अंतरंगी धावा, जागविती भान.
पाषाणही शांत, भव्य तुझी मूर्ती,
दिव्यत्व प्रचिती, पसरली कीर्ती.
उधळला जीव, सदा ज्याच्यावरी,
भेटी लागे आस, देवा तुझ्या द्वारी.
कानडा विठ्ठल, प्रकाश ज्योती.
मजवर व्हावी, कृपावंत प्रीती


जनमानसांत रुजलेल्या तुकोबांच्या अभंगातून काया वाचा अबोल देह बोलू लागतो. नाचू कीर्तनाचे दंगी श्वास श्वास पांडुरंगमय होतो. शहरासारख्या ठिकाणी माझ्या मनाला लागलेली भक्तिमय ओढ हुरहर माझ्या अभंगातून अवतरते. दूर उभा असतो पांडुरंग पण माझी लेखणी त्याला अनुभवते... या सुखा कारणे माऊलीच्या अभंगातून स्वत:ला समृद्ध करते.


युगे युगे विठू । उभा विटेवरी।
चाले पायी वारी । पुंडलिक॥
नाही तिन्ही लोकी । एक वारी अशी।
उद्धरिला जाशी। पंढरीत॥
आवडते देवा। मला तुझी भक्ती।
हीच माझी शक्ती। संसारात॥
लाभला देहास। सुखाचा संसार।
दुःखाचा विसर। आपोआप॥
अबीर गुलाल। उषेचे निशेचे।
फळ संचिताचे। स्मरणात ॥
तुझीया चरणी। मस्तक ठेवते।
चित्तास लाभते। समाधान ॥
पुजा करी रोज। तुझ्या चरणांची।
माझ्या माऊलीची। भगवंत॥


एकीकडे विठ्ठल दर्शनाची आस, हाती भगवा झेंडा, मुखी नामाचा जयघोष आणि पाऊले चालती पंढरीची वाट. या वाटेवर षड्ररिपूचे दमन आणि दहन होऊन सकारात्मकतेची ऊर्जा आढळते. गळा तुळशीच्या माळा घालून, एकाचं ध्यासाने तल्लीन झालेला वारकरी नैसर्गिक संकटाची तमा न बाळगता, ऊन, वारा, पावसावर मात करत आनंदवारी जागवितो. त्याच्या श्वासातून येणारा विठ्ठल नामाचा घोष वातावरणाला चैतन्य प्रदान करतो. विठ्ठलाचं सोज्वळ रूप वारकऱ्यात दिसतं. तुळसाबाईला डोक्यावर नाचवत दंग असणारी ताई, माई रुक्मिणीच्या भूमिकेत वावरताना पाहिली की, संतसमागम अनुभूती येते. आळंदी ते पुणे पुढे सासवड मार्गावर वारकरी रूपातल्या माऊलीचं दर्शन मावळतीच्या सूर्यालाही कुर्निसात करायला लावतं. नादब्रम्ह वारी ते रिंगण सोहळा, स्वप्नपूर्तीच्या भक्तिमय वाटेवर आळंदी मंदिराच्या कळसाची संकेतमय खूण, ही पहिल्या वारी प्रवासाची सुरुवात ठरलेली असते. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांचा पालखी मार्ग वेगळा असला तरी, त्यांच्या एकत्र येण्यानं पुणे शहर दुमदुमतं.


पालखी मार्गावरचे स्वागत, फुलांच्या पायघड्या, खिल्लारी बैलजोड्या, जोडीला खेळ, सेवा, भजन, कीर्तन ब्रह्मानंदी टाळी अशी लागते की, जणू स्वर्गचं पृथ्वीवर अवतरलायं आणि जेव्हा आषाढी एकादशीचा दिवस उजाडतो. तेव्हा महिन्याभराची पायपीट, त्रास कोणाच्याचं चेहऱ्यावर दिसत नाही. अवघा परिसर विठ्ठलमय होतो. पावसानं तुडुंब भरलेली चंद्रभागा वारकऱ्यांना कुशीत घेण्यासाठी सरसावते. दूरवर सनईचे स्वर घुमतात. टाळ, मृदंग वाद्य शिगेला पोहोचतात. घंटानादाला स्फुरण चढतं. अंतिम कृपादृष्टीचा एकचं ध्यास उरतो. काकड आरती रंगात येऊ लागते. पावलं झपझप पडू लागतात. रांगा चढू लागतात.


दुकानं भरू लागतात. हिरव्या गर्द तुळशीमाळा विठ्ठल रखुमाईच्या गळ्यात पडण्यासाठी आतुर असतात. विठ्ठल दर्शनानं कृतार्थ झालेलं मन गहिवरतं. कंठ दाटून येतो, डोळे पाणावतात. जन्माचं सार्थक झाल्याचे भाव प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. विठ्ठलपुरी पंढरी वर्षभर जगण्याचं बळ हे असं पुरवते. सुखावलेला वारकरी तनामनाने पावसाच्या कृपादृष्टीचं वरदान मागत, पुढील आषाढीसाठी परत पावली आनंदानं माघारी फिरतो...

Comments
Add Comment