
लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
प्रत्येक माणसाला आपल्या मूलभूत आणि इतर गरजा भागविण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागते. या गरजा भागवत असताना त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. समस्या सोडवण्याचा ताण त्याच्या मनावर येतो. हवं ते घडत नाही व नको ते घडतं ही आजची मानवी जीवनाची शोकांतिका आहे. Unwanted things keep on happening and wanted things do not happen. This is the
tragedy of man’s life
एखादी चांगली किंवा वाईट घटना घडल्यामुळे मनावर किंवा शरीरावर दुष्परिणाम होत असेल तर त्याला ताण असे म्हणतात. धावपळीच्या जीवनामध्ये अनेक कारणांनी दैनंदिन जीवनामध्ये ताण निर्माण होतात. उदाहरणार्थ - प्रवासाला जाताना बस चुकणे, पेपर अवघड जाणे, नोकरी न मिळणे, परीक्षेत नापास होणे, नोकरीवरून काढून टाकणे इ.
शरीराने ताणाला दिलेला प्रतिसाद म्हणजे तणाव.
Response given by the body to the stress is strain
ताण : पेपर अवघड जाणे, परीक्षेत नापास होणे, अपशब्द ऐकणे, नोकरीवरून काढून टाकणे. तणाव - भूक न लागणे, राग, संताप येणे, निराश होणे.
ताणाची कारणे : १) चिंता २) संघर्ष ३) वैफल्य ४) दबाव.
१. चिंता : माणसाने काळजी घ्यावी. काळजी करू नये.
चिंतेचे दुष्परिणाम - चिंतेमुळे अधिक ताण शरीरावर व मनावर येतो. त्यामुळे खालील दुष्परिणाम होतात.
एकाग्रतेचा भंग, कार्यक्षमता कमी होणे, व्यसनाधीनता, रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम, वैफल्यग्रस्तता, मानसिक परिणाम, इतरांशी मतभेद.
२. संघर्ष : अपघात, दुष्काळ, पूर, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्पर्धा, महागाई यामुळे माणसाच्या मनात संघर्ष निर्माण होऊन त्याचा ताण निर्माण होतो.
३. वैफल्य : माणसाने ध्येय ठरविले नसेल तर त्याचे जीवन दिशाहीन नौकेप्रमाणे भरकटते व ताण निर्माण होतो. ध्येय साध्य करण्याचा ध्यास घेऊनही ते सत्य झाले नाही तर वैफल्य येते. नोकरी न मिळाल्यास वैफल्य येते.
४. दबाव : आई-वडील किंवा पालक आपली स्वप्ने मुलांवर लादतात. त्यामुळे मानसिक ताण निर्माण होतो.
यासाठी काही उपाय करावेत :
शवासन करावे : शव म्हणजे प्रेत. प्रेतासारखे पडून राहणे म्हणजे शवासन. संध्याकाळी पाच ते दहा मिनिटे शवासन केल्यास सर्व शारीरिक व मानसिक थकवा दूर होतो.
छंद जोपासणे : वाचन, चित्रकला, संगीत, पेंटिंग, सहली, निसर्गभ्रमण, पोहणे अशासारखे छंद जोपासावेत म्हणजे मनाला आनंद वाटतो, प्रसन्नता लाभते.
सकारात्मक दृष्टिकोन : समोरच्या गोष्टीमध्ये व्यक्तीमध्ये जे चांगले असेल ते घ्या. वाईट असेल ते सोडून द्या. सकारात्मक दृष्टिकोनामुळे ताणतणाव कमी होऊन जीवनामध्ये यश मिळते. झोप शांत व पूर्ण वेळ झोप झाली तरच दुसऱ्या दिवशी कामात उत्साह वाटतो. रोजचा आहार पोषक असावा. फळे, पालेभाज्या आहारात असाव्यात. जेवल्यानंतर कोणतेही काम करण्यास हुशारी वाटावी इतकाच आहार घ्यावा.
व्यायाम : दररोज घाम येईल इतकाच व्यायाम आवश्यक आहे. व्यायाम ही शरीराला मिळालेली संजीवनी असते. आवडीचे काम करावे.
विद्यार्थ्यांना ताणतणाव का होतो?
१. अभ्यासाचा ताण २. परीक्षेची चिंता. ३. पालकांची अपेक्षा. ४. मित्रांशी भांडण. ५. वेळेचे योग्य नियोजन न करणे.
ताण कमी करण्याचे काही सोपे उपाय :
१. दररोज अभ्यासाची सवय लावा. शेवटच्या क्षणी अभ्यास केल्यावरच तणाव वाढतो.
२. झोप पूर्ण घ्या. ताजेतवाने मनच अभ्यासात लक्ष ठेवते.
३. खेळ, छंद यासाठी वेळ द्या. क्रिकेट, गाणं, चित्रकला - हे मन शांत करतात.
४. आई-वडिलांशी किंवा शिक्षकांशी बोला. मनातलं बोलल्यावर खूप हलकं वाटतं.
५. “मी करू शकतो” असा आत्मविश्वास ठेवा. सकारात्मक विचार खूप मदत करतात.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा :
ताणतणाव आपल्याला थांबवू शकतो.
जर आपण त्याला योग्य पद्धतीने हाताळलं, तर तो आपल्याला यशाकडे नेऊ शकतो.
तणाव न घेता, त्याचे योग्य व्यवस्थापन शिकले, तर आपले जीवन आरोग्यदायी, आनंदी आणि यशस्वी होईल.
ताणतणाव म्हणजे काय?
ताणतणाव म्हणजे एखाद्या प्रसंगाला किंवा जबाबदारीला मन किंवा शरीराने दिलेली नैसर्गिक प्रतिक्रिया. तो कधी-कधी प्रेरणा देणारा असतो, पण सततचा व अनियंत्रित ताण आरोग्यास घातक ठरतो.
ताणाचे शरीरावर होणारे परिणाम : डोकेदुखी, थकवा, झोपेचा अभाव, चिडचिड, निराशा, आत्मविश्वास कमी होणे, रक्तदाब वाढणे, हार्मोनल असंतुलन, कामांवर लक्ष न लागणे.
ताणतणाव व्यवस्थापनासाठी उपाय :
१. शारीरिक आरोग्याची काळजी घ्या : नियमित व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार.
२. मन : शांतीसाठी वेळ द्या : ध्यानधारणा, प्राणायाम, निसर्गात वेळ घालवा.
३. वेळेचे योग्य नियोजन करा : कामांचे प्राधान्य ठरवा, ‘ना’ म्हणायला शिका, एकावेळी एकच काम करा.
४. सकारात्मक विचारधारा ठेवा : आत्मपरीक्षण करा, यशाच्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा.
५. सामाजिक आधार वापरा : विश्वासू मित्रांशी बोला, कौटुंबिक सहकार्य घ्या, गरज वाटल्यास समुपदेशकांची मदत घ्या.
ताणतणाव हा जीवनाचा भाग आहे, पण तो आपल्यावर हावी न होऊ देता आपण त्याला हाताळायला शिकणे हेच खरे कौशल्य आहे. तणावमुक्त जीवन म्हणजे आनंदी जीवन आणि ते आपल्याच हाती आहे.