Friday, August 29, 2025

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत शुक्रवारी केली. आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरऐवजी साध्या कागदावर अर्ज करून विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत. त्यामुळे विशेषतः विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासह शासकीय कार्यालयांत दाखल कराव्या लागणार्या सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशी प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागत होते. आता केवळ स्वसाक्षांकित अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्रे मिळू शकणार आहेत. त्यामुळे दरवेळी पालकांचा होणारा खर्च वाचणार आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल लागतो, तेव्हा सर्व विद्यार्थी व पालकांची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी धांदल सुरू होते. केवळ शैक्षणिकच नाही, तर इतर अनेक कारणांसाठीही दाखले लागतात.

महसूलवाढीसाठी अशा दाखल्यांसाठीचे मुद्रांक शुल्क १०० रुपयांवरून ५०० रुपये करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला होता. या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा विद्यार्थ्यांना बसणार असल्याने हा निर्णय मागे घेत सर्वप्रकारचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय बावनकुळे यांनी जाहीर केला होता. आता या निर्णयाची माहिती त्यांनी निवेदनाद्वारे सभागृहात दिल्याने या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच होणार आहे.

विद्यार्थी, पालकांकडून स्वागत

महसूलमंत्री बावनकुळे यांनी, प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर प्रामुख्याने विद्यार्थी आणि पालकांनी या घोषणेचे जोरदार स्वागत केले आहे. यामुळे आता साध्या कागदावर अर्ज करून आम्हाला आवश्यक दाखले मिळवता येतील, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >