
जळगाव : रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला आणि नातेवाइकांनी ओळख पटवत त्याचे शवविच्छेदनही करून घेतले. घरी तिरडी आणली गेली, अंत्यसंस्कारासाठी लागणारा सामानही आणला गेला. घरी सर्व नातेवाईक आले आणि रडारड सुरू झाली. मात्र, ज्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली, ते रघुनाथ वामन खैरनार (६५, रा. पाळधी, ता. धरणगाव) हे इथे बसले आहेत’, असे सांगणारा फोन आला आणि तो खराही निघाला. अचानक रघुनाथ खैरनार हे घरी परतल्याने कुटुंबीय, नातेवाईक थक्क झाले आणि हा नेमका काय चमत्कार आहे, या विचारात पडले. प्रत्यक्षात ज्या मृतदेहाची ओळख पटविली, तो दुसऱ्याचाच असल्याचे स्पष्ट झाले आणि तो पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परत नेण्यात आला.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी रघुनाथ खैरनार हे घरी कोणाला काहीही न सांगता गेल्या तीन ते चार दिवसांपासून घरून निघून गेले होते. बेपत्ता असल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत असताना शनिवारी (दि. ५) सकाळी पाळधी गावाजवळच रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला. ही माहिती गावात पसरताच गावकऱ्यांसह बेपत्ता वृद्धाचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोलिसही आले. पण आत्महत्या करणाऱ्या माणसाचा चेहराच नष्ट झाल्यामुळे हा माणूस कोण आहे, हे मात्र कळत नव्हते. पाळधीतील मिलिंद भालेराव यांनी मृतदेहाच्या अंगावरील कपडे पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले, हा तर आमचा रघुनाथ खैरनार.
रघुनाथ खैरनारांच्या घरी बातमी पोहोचली. रडारड सुरू झाली. त्यांचा मुलगा पुण्यात असतो. त्यालाही फोन करून बोलावण्यात आले. मृतदेह तिथून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घरी तिरडी आणली गेली, अंत्यसंस्कारासाठी लागणारा सामानही आणला गेला. मुलगाही पोहोचला. अंत्ययात्रेसाठी मृतदेह घरी पोहोचणार, तेवढ्यात ‘रघुनाथ खैरनार तर इथे बसले आहेत’, असे सांगणारा फोन आला. खरे तर आत्महत्या – करणारी व्यक्ती होती पथराड येथील ज्ञानेश्वर अर्जुन पाटील. त्यांचेही वय – ५५ व अंगकाठी, कपडेही रघुनाथ खैरनार घालतात तसेच. तेही सकाळपासून घरून बेपत्ता झाले होते व त्यांचे कुटुंबीय त्यांचा पथराड परिसरात शोध घेत होते. पण त्यांनी आत्महत्या केली असेल, याची त्यांना कल्पना आली नाही. पोलिसही रघुनाथ खैरनार म्हणूनच त्यांचा मृतदेह हाताळत राहिले. शवविच्छेदन झाले तेही त्याच नावाने.
मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळण्यात आला व तो पाळधीकडे रवानाही करण्यात आला. पण मुलगा पुण्याहून घरी पोहोचायचा होता. त्यामुळे शववाहिनी पाळधीच्या पेट्रोल पंपाजवळच थांबवून ठेवण्यात आली होती. मुलगा सायंकाळी घरी पोहोचला आणि तेवढ्यात गावातील एकाचा फोन आला, ‘रघुनाथ तर इथे बसला आहे’. सांगणारा खरेच सांगत होता; पण विश्वास कोण ठेवणार? खात्री करण्यासाठी व्हिडिओ कॉल करायला सांगण्यात आले. त्यांनी केलाही. पलीकडे बसलेले रघुनाथ खैरनार हात हलवून आपण जिवंत असल्याचे सांगत होते. एका क्षणात वातावरण बदलले. यामुळे नातेवाईक, कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला व दुसरीकडे बाबांना जिवंत पाहून आनंदही गगनात मावेनासा झाला. सर्व हकीकत समजल्यानंतर पाळधी पोलिसांना कळवून मृतदेह रुग्णालयात परत नेण्यात आला.