नाटककार जयवंत दळवी

  18

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर


जयवंत दळवींना ‘साहित्यिक’ ओळख मिळण्याआधीची पंधरा-सोळा वर्षे वेंगुर्ल्यातील आरवली गावात गेलीत. समुद्रकिनारी असलेला हा अत्यंत सुंदर आरवली लहानसा गाव. लाटांच्या गाजेने माणसांना पहाटे जाग आणतो. येथील मुख्य आहार मासे-भात! पाकक्रियेची पाचपन्नास पुस्तके वाचूनही बनवता येणार नाही असा रुचकर व झटपट स्वयंपाक दळवींची आई बनवत. लाल, जाड्या तांदळाचा भात, मासळीची आमटी, तळलेली मासळी आणि मासळीचे सुके हेच दळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आवडीचे जेवण. ते म्हणत, माझे मासळीचे प्रेम आणि फिश खाणाऱ्यांचे प्रेम यात फरक आहे.


मी अजून ‘आरवलीकर’ राहिलो आहे. ‘मी आरवलीकर’ असल्यामुळेच माझी आवडनिवड वेगळी आहे आणि बरीचशी ऋतुमानाशी निगडित आहे.
दळवींच्या ‘मत्स्यावतारात’ माशांच्या कितीतरी प्रकारांची, बनवण्याच्या पद्धतींची आणि त्यांच्या चवींची वर्णने आलेली आहेत. म्हणूनच आरवली सोडून गेल्यानंतरही आपल्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी त्यांनी स्वत: जपल्या. आपल्या पत्नीच्या स्वयंपाकाची ते तिच्या पुढ्यात स्तुती न करता जाहीरपणे ते लिहितात, ‘आमच्या घरी पाकक्रियांचे पुस्तक पाहून मासळीचे जेवण होत नाही. त्यासाठी ‘हात’ लागतो. आंतरिक जाणिवा समृद्ध व्हाव्या लागतात.


जयवंत दळवींचे आरवलीचे घर म्हणजे एक ऐसपैस वास्तू. मूळचे छोटे घर गरजेप्रमाणे त्या त्या वेळी वाढवलेले आहे. ते घर जसे अस्ताव्यस्त तसेच त्यांचे एकूण घराणेही अस्ताव्यस्त होते. एकूण गावाचा-गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा-वृत्ती-प्रवृत्तींचा, वासनेचा, उदात्ततेचा, संस्कृतीचा, विकृतीचा, स्वार्थाचा आणि निरीच्छ-नि:पक्षतेचा ठसा त्यांच्या साहित्यातून उमटलेला दिसतो. ते घरच्यांना कधी लेखक वाटले नाहीत. इतर लेखक आपल्या घरी लेखक दिसतात.


आपल्या कुटुंबात लेखक दिसणे म्हणजे काय? लेखक म्हणून त्यांना वेगळी खोली हवी किंवा जिथे तो लिहायला, वाचायला, चिंतनाला बसतो तिथे दुसऱ्या कोणाची ये-जा असता नये. तिथे त्रास होईल एवढ्या मोठ्याने कोणी बोलता कामा नये, हसता कामा नये, जयवंत दळवींना आपण लेखक आहोत असे कुटुंबात कधी वाटले नाही. काही वर्षे ‘प्रभात’ व ‘लोकमान्य’ वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस’(यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले.


दळवींच्या ‘महानंदा’ सिनेमात त्यांच्या आरवलीच्या घराची दृश्ये आहेत. तरीसुद्धा तो चित्रपट मुंबईत लागला तेव्हा घरातल्या कोणीही तो पाहिला नाही. त्यांनी कधीच ‘मी लेखक आहे’ अशी ऐट घरात ठेवली नाही. ते स्वत: पत्नी-मुलांमध्ये आपल्या साहित्याविषयी बोलत नसत; परंतु कोणी त्याबद्दल बोलले तर निमूट ऐकून घेत. त्यांचा स्वभाव याला कारणीभूत असेल. अनेकांना आत्मस्तुती आवडते.


त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा स्वत:बद्दलचा प्रांजळपणा त्यांच्या कथा, कादंबरी नाटकांतूनच नव्हे तर त्यांच्या विनोदी लेखनातूनही जाणवतो. अरविंद गोखले यांच्या ‘उभा जन्म उन्हात’ या कथेवर त्यांनी नाटक लिहून नाट्य लेखनाला सुरुवात केली. सांगली, कोल्हापुरातील पाच प्रयोगांनंतर ते मुंबईला लागले. तिकीट विक्री होईना म्हणून पदरचे शंभर-दीडशे खर्चून चार-चार, पाच-पाच जिने चढून फुकट पास वाटले. प्रयोगाला गर्दी जमली.


मंगेश पाडगावकर पासावरचे नाटक पाहूनही कंटाळले, वैतागले आणि ‘दळवी, हे बंद करा!’ नाटक हा तुमचा प्रांत नाही! भाषणे आणि नाटके तुम्हाला जन्मात जमणार नाहीत असे सांगितले. पैकी पहिले खरे होते. पण दुसरे दळवींनी खोटे पाडले. ‘सभ्य गृहस्थ हो!’ हे नाटक लिहिले. ते यशस्वी झाले. पण पहिल्या पडलेल्या नाटकाबद्दलचे सगळे आक्षेप, सगळ्या टीका त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या. त्यांच्या बऱ्याच कथा, कादंबऱ्या, नाटकांतून वेडसर-वेडगळ स्तरावरची माणसे दिसतात. त्यावरही खूप पत्रे, प्रतिक्रिया. सतीश दुभाषी या प्रख्यात नटवर्याने एकदा गंभीरपणे सांगितलंही, ‘दळवी, मी सांगतो म्हणून राग मानू नका!’ पण एके दिवशी तुम्हाला वेड लागेल! तुम्ही सावध राहा! तुम्हाला या वेड्या माणसांचे इतके वेड आहे की, ती माणसे एकदा तुम्हाला वेड लावतील.


तुम्ही तो नाद सोडा!’ या बोलण्याचा आपल्यावर झालेला परिणाम १९८४ च्या कदंब दिवाळी अंकातील आपल्या लेखात अत्यंत विनोद बुद्धीने चित्रित केला आहे. त्यांच्यातील खोडकर व्रात्य मूल त्यांच्या साहित्यातून जाणवते. त्यांची विनोदबुद्धी नि खिलाडूपणा जाणवणे त्याचबरोबर एक साहित्यिक शैली. पूर्णवेळ लेखन-वाचन करण्यासाठी निवृत्तीच्या सात वर्षे आधीच चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला नि अमलात आणला.


दिसण्यात गंभीर आणि आतून विनोदी असल्याने ललित मासिकातील ‘ठणठणपाळ’ हे सदर सलग वीस वर्षे चालले. जयवंत दळवींनी कथा, विनोद, प्रवासवर्णन, कादंबरी, एकांकिका, नाटक असे विविध वाङ्मय प्रकार लिहिलेत, पण साहित्य क्षेत्रातील आपल्या मोलाच्या कामगिरीबद्दल त्यांनी कोणाशी चर्चा केली नाही. ‘सूर्यास्त’ नाटकाचे दोनशे प्रयोग झाल्यावर एकदा दोन रुपयाचे तिकीट काढून शिवाजी मंदिरच्या गॅलरीत बसले आणि तिथे नातेवाइकांना बघताच नाटक न बघताच घरी परतले.


त्यांनी स्वत: नाटके लिहिली. लोकांनी त्यांच्या कादंबऱ्यांवर नाटके तयार केली, चित्रपट काढले. मात्र त्यांच्या निकोप मनाला कधी अहंपणा शिवला नाही. त्यांचा परमेश्वरावर विश्वास नव्हता. देवावरही नव्हता. पण वेतोबावर होता. याबद्दल कोणी हटकले तर ते म्हणत, ‘आयुष्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून तो माझा साथी आहे. वेतोबा! माझा संकल्पनेतला साथी. जयवंत दळवी यांनी ठणठणपाळ या टोपणनावाने काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले होते. जयवंत दळवी यांचे १६ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत. )


Comments
Add Comment

आषाढी एकादशीनिमित्त...

सुंदर ते ध्यान : समतेची प्रेरणा ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल... आषाढ सुरू होताच अवघ्या महाराष्ट्राला पंढरपूरच्या

‘जिथे शब्द थांबतात तिथे गुरू बोलतो...’

ऋतुजा केळकर आयुष्याच्या पहिल्या क्षणी, जेव्हा मी रडत या जगात आले, तेव्हा जिने मला कुशीत घेऊन शांत केलं, तीच माझी

ययाती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे राजा नहूषला यती, ययाती, संयाती, आयती, नियती व कृती असे सहा पुत्र होते. नहूषाला

आधुनिक काळातील ‘पिठोरा चित्रकला’

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीविषयी अनेक दिवस लेख लिहीत आहे. यामध्ये पूर्वी मधुबनी चित्रशैली आणि वारली

तुलना

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजच्या जागतिकीकरणाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात आपण जितके एकमेकांशी जोडलेले आहोत,

दर्शन पांडुरंगाचे

स्नेहधारा : पूनम राणे सकाळचे ९ वाजले होते. सुदेश घाईघाईने कामानिमित्त मुलाखत द्यायला निघाला होता. तिथूनच तो