आषाढी एकादशीनिमित्त...

  20

सुंदर ते ध्यान : समतेची प्रेरणा


‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल...


आषाढ सुरू होताच अवघ्या महाराष्ट्राला पंढरपूरच्या विठू माऊलीच्या भेटीची ओढ लागते.
‘भेटीलागी जीवा लागलीसे आस।
पाहे रात्री दिवस वाट तुझी’...||


या ओढीतच वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत! पंढरपूरच्या विठोबाला श्रीकृष्णाचे स्वरूप मानले जाते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्राचे पवित्र तीर्थक्षेत्र!



“गजर विठुनामाचा, सोहळा आषाढ वारीचा...” वैष्णवांचा हा पवित्र दिन! आषाढ वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा आहे. या आषाढवारीत लाखो भाविक ताल मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत, अंदाजे २१ दिवस गावागावांत थांबत पायी चालत एकादशीला पंढरपूरला पोहोचतात. गावात होणाऱ्या सामुदायिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत अध्यात्मिक प्रवचन, भजन, कीर्तन, फुगड्याचे प्रकार, काही खेळ खेळतात. संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली म्हणून आळंदीवरून ज्ञानोबांची पालखी, तुकोबाचे जन्मगांव असलेल्या देहू येथून तुकोबारायांची पालखी, अशा अनेक संतांच्या पालख्या निघतात. पादुका दर्शनासाठी वेळापत्रकाप्रमाणे पालखी थांबते. वारकरी संप्रदायात भेदभाव नाही. आषाढी एकादशीला सारे भाविक चंद्रभागेच्या तीरी पंढरपुरात विसावतात. असा हा अखंड भक्तीचा कल्लोळ! ही वारी भक्ती, नम्रता आणि समतेची प्रेरणा देते.


ज्ञानदेवांच्या घरांत पंढरीच्या वारीची परंपरा होती. तेथे संतश्रेष्ठ नामदेव महाराजांशी परिचय झाला. संत नामदेवांनी चंद्रभागेच्या वाळवंटात जमलेल्या विठ्ठल भक्तांना सांगितले, ‘पांडुरंग हा सर्वश्रेष्ठ भगवंत असून आपण सारे त्याचे उपासक (लेकरे) आहोत. तो पांडुरंग अंश रूपाने सर्वांच्या अंतःकरणात आहे. तेव्हा हे भेदाभेद मानणे म्हणजे भगवान विठ्ठलाला दुजेपणाने वागविले असे होईल.’ हे सूत्र निश्चित करून भागवत संप्रदाय उदयास आला. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला सुरुवात झाली असे म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत संप्रदायाची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन साऱ्या जातीपातीच्या लोकांना एकत्र करून वारीच्या सोहळ्यांत सामील करून घेतले. त्यानंतर इतरही संतांनी ही परंपरा जागवली.


वारकऱ्यांच्या सेवेतच पांडुरंगाचे दर्शन घेणारे अनेक आहेत. दिवसाला दहा हजारांच्या वर वैद्यकीय उपचार होतात. पायाला तेल लावणे, पाय चेपणे, गावातील रहिवासी नाश्ता, जेवण, राहण्यास जागा देतात. गेल्याच वर्षी करमाळ्याला असताना माझ्या नणंदेच्या शेजाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे एका गटाला संध्याकाळचा चहानाश्ता, रात्रीचे जेवण दिल्याचे मी अनुभवले. संध्याकाळच्या पूजा, आरती सोबतच्या कार्यक्रमात आम्हीही सहभागी झालो. दुसऱ्या दिवशी काही तासांसाठी आम्ही इंदापूर जवळ वारीत सामील झालो. सारे कष्टकरी तरी चेहऱ्यावर दमलेल्याचा भाव नाही. मुखी हरिनाम. त्यांच्यासोबत आम्हीही हाताचा ताल धरला. तुकोबांच्या पालखीचे, पादुकांचेही दर्शन घेण्यासाठी आम्ही आमच्या पायाचा वेग वाढविला. पादुकाचे दर्शन घेताना कुठेही गोंधळ-अर्वाच्य भाषा नाही.


फक्त एकच सौम्य शब्द माऊली ! तेवढ्यात पांढऱ्या शुभ्र रंगाचे, सजविलेले दोन उमद्या खिलारी बैलाची जोडी तेथे आली. उंच, मजबूत, त्याची शिंगे लक्ष वेधून घेत होती. ती खिलारी बैलाची जोडी पालखीला जोडल्यानंतर आम्हीही थोडे पालखीसोबत चाललो. तेथून पाठी फिरताना वारीचे खरे दर्शन झाले. एकामागून एक येणारे वारकऱ्यांचे समूह. पांढऱ्या पोशाखात समतेची पताका खांद्यावर घेऊन चालणारे पुरुष, तुलसी वृंदावन, विठू रख्माईची मूर्ती, स्वतःच्या कपड्याचे गाठोडे डोक्यावर घेऊन जाणाऱ्या पाठीमागे आयाबहिणी. पुढे गॅस, भांडी, अन्नधान्यांनी भरलेले दोन ट्रक. भाविक विसावा घेत होते.


पुलाखाली सेवेकरी जेवण देत होते. पुढे पाणवठ्यांच्या जागी आयाबहिणीच्या साड्या सुकत होत्या. समूहाची अनुभूती मी अनुभवत होते. वारकरी लोकांचे कोणाकडेही कसलेच मागणे नाही. शेत, घरातल्या प्रश्नांचा विचारही न करता फक्त पुंडलिकांच्या भेटीची ओढ. त्यांच्यात श्रद्धा आणि भक्ती यांचे रूप मी पाहत होते. पांडुरंग आपला त्राता आहे हे वारकरी जाणतात. ‘नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पति तो लक्षीमीचा पावतसे.’...


पांडुरंग आपल्या भक्तासाठी, पुंडलिकासाठी पंढरीत भेटायला का आला त्याची कथा - एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला जाताना जंगलात वाट चुकला. पुंडलिकाने वाटेतल्या आश्रमातील महर्षी कुकुटस्वामींना काशीला जाण्याचा मार्ग विचारला. तेव्हा ऋषी म्हणाले, आजपर्यंत मी काशीला गेलो नसल्यामुळे काशीला जाण्याचा मार्ग मला माहीत नाही. हे ऐकताच पुंडलिक म्हणाला, ‘तुम्ही स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला गेला नाहीत? त्या ऋषींची खिल्ली उडवून पुढे चालू लागला. आश्रामापासून थोड्या अंतरावर जाताच त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला. आश्रमांत तर एकही बाई नव्हती.


पुन्हा मागे फिरून पाहतो तर काय? पुंडलिकाला आश्चर्य वाटले, ‘ज्या कुकुटऋषीने काशीचे दर्शनही घेतले नाही, त्यांना काशीचा रस्ताही माहीत नाही, त्या कुकुट ऋषींचा आश्रमांचे पावित्र्य खुद्द गंगा, यमुना आणि सरस्वती माता राखत आहेत. त्या तिन्ही मातांनी सांगितले, ‘मनांत पवित्रता आणि पूज्यता असल्यावर पवित्र स्थळांना भेटी द्यायचा किंवा कर्मकांड करणे हे आवश्यक नाही.’ कुकुट ऋषींनी पवित्र चित्ताने, समर्पित भावनेने आपल्या आई-वडिलांची सेवा केली. म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्त झाली आहे.


पुंडलिकांच्या आई-वडिलांनाही काशीला जाण्याची इच्छा होती. पुंडलिकाने त्याची इच्छा पूर्ण न करता स्वतःच्या मोक्षासाठी तो काशीला निघाला होता. वरील घटनेनंतर पुंडलिकाचे आयुष्यच बदलून गेलं. तो घरी आला, आपल्या आई-वडिलांना काशीत आणले. त्याचा जीव आता फक्त आई-वडिलांच्या सेवेत जात असे. पुंडलिकाच्या अमर्याद मातृपितृ भक्ती पायी भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी आले. देव आपल्या घरी आलेले पाहून पुंडलिकाला खूप आनंद झाला, पण पुंडलिकाचे मन जराही विचलित झाले नाही. मातापित्याच्या सेवेत खंड पडू नये म्हणून पुंडलिकाने देवाला उभं राहण्यासाठी जवळ पडलेली वीट टाकतो.


आई-वडिलांच्या सेवेनंतर भगवान श्रीकृष्णाची त्यांनी क्षमा मागितली. प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितलें. पुंडलिक म्हणाला,’ तुम्ही स्वतः माझी प्रतीक्षा करता, तेव्हा मी आणखी काय मागू? परंतु भगवानाने आग्रह धरल्यामुळे पुंडलिक म्हणाले, “तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या. तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या. “तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे ‘पंढरपूर’! आपण ‘विठोबा’ म्हणून ओळखले जाऊ असे श्रीकृष्णाने सांगितले. विठोबाचा अर्थ ‘विटेवर उभा देव’! आज पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे. ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्याच आकारात आली आहे.


कोणतेही शस्त्र न घेता किंवा आशीर्वादाचा हात पुढे न करता, भरजरी वस्त्रे, अलंकार धारण न करता, कमरेवर हात ठेवून शांत, प्रसन्न चित्ताने श्री भगवान विठ्ठल उभा आहे. काही देण्यापेक्षा त्या मूर्तीकडे पाहिल्यावर सर्व काही मिळाल्याचा आनंद होतो एव्हडे सावळे सोज्वळ सगुण रूप ! यातून तो जगाला समतेची प्रेरणा देत आहे.
आज आषाढी एकादशी ! “अवघे गर्जे पंढरपूर। चालला नामाचा गजर॥” लाखो लोकांमुळे आषाढी एकादशीला भाविकांना दर्शन फक्त कळसाचे होते.


काहीजण चोखोबा आणि संत नामदेवाच्या पायरीवर माथा टेकत समाधानाने, आनंदाने माघारी फिरतात. आषाढी एकादशी करताना “पांडुरंग विटेवर का उभा आहे” हे पहिले जाणून घ्या. मातापित्यांच्या सेवेत कुठेही खंड पडू नये म्हणून पुंडलिकाने पांडुरंगापुढे विट फेकली. ‘आई- वडील हेच दैवत, हीच मोठी शिकवण एकादशी देते. “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल.”…
mbk1801@gmail.com

Comments
Add Comment

नाटककार जयवंत दळवी

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर जयवंत दळवींना ‘साहित्यिक’ ओळख मिळण्याआधीची पंधरा-सोळा वर्षे वेंगुर्ल्यातील आरवली

‘जिथे शब्द थांबतात तिथे गुरू बोलतो...’

ऋतुजा केळकर आयुष्याच्या पहिल्या क्षणी, जेव्हा मी रडत या जगात आले, तेव्हा जिने मला कुशीत घेऊन शांत केलं, तीच माझी

ययाती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे राजा नहूषला यती, ययाती, संयाती, आयती, नियती व कृती असे सहा पुत्र होते. नहूषाला

आधुनिक काळातील ‘पिठोरा चित्रकला’

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीविषयी अनेक दिवस लेख लिहीत आहे. यामध्ये पूर्वी मधुबनी चित्रशैली आणि वारली

तुलना

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजच्या जागतिकीकरणाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात आपण जितके एकमेकांशी जोडलेले आहोत,

दर्शन पांडुरंगाचे

स्नेहधारा : पूनम राणे सकाळचे ९ वाजले होते. सुदेश घाईघाईने कामानिमित्त मुलाखत द्यायला निघाला होता. तिथूनच तो