Saturday, August 30, 2025

शेजारधर्म

शेजारधर्म

कथा : रमेश तांबे

एका फुलबागेत होती खूप खूप फुलझाडे, त्यावर होती असंख्य फुले, त्यात होती एक नाजूक कळी नुकतीच होती जन्मलेली नाजूक, गोंडस, रंगुली! ती सारी बाग टकामका बघायची गालातल्या गालात हसायची वाऱ्यावर झोके घ्यायची आईकडे बघून छान हसायची कळी हळूहळू मोठी होऊ लागली तशी अधिक सुंदर दिसू लागली यामुळे तिला झाला गर्व वाटू लागले फिके तिला सर्व ! कळी कुणाशी बोलायची नाही कुणाशी खेळायची नाही ती नेहमी आपल्याच तोऱ्यात, आपल्याच कोषात तिला वाटायचं माझ्यासारखी मीच मीच आहे राणी मीच म्हणणार गाणी! त्या फुलपाखरांचादेखील तिला राग यायचा त्यांच्या रंगांचासुद्धा तिला हेवा वाटायचा कोण कुठली ही फुलपाखरं कशाला येतात इथं? पण काहीच करता येत नव्हतं कळीला ती आईला म्हणायची, “हाकलून दे या फुलपाखरांना, किती त्रास देतात आपल्याला! कळीचं बोलणं ऐकून आई हसायची अन् कळीला म्हणायची, “अगं कळी ते मित्रच आहेत आपले त्यांच्यामुळेच जीवन आहे आपले ! कळीला काही कळायचे नाही आईचं बोलणं विसरून जायची. तितक्यात एक फुलपाखरू कळीवर येऊन बसलं तिच्याकडे बघून गोड हसलं पण कळीच्या मनात होती अढी तिने फिरवली आपली मुंडी कशाला बसतात आमच्या अंगावर मग फिरत बसतात गावभर! खरंं तर फुलपाखरे, भुंगे, चतूर कळीशी बोलायला असायचे अतूर पण कळी मात्र ढिम्म तोंड तिचे नेहमीच बंद! कळीच्या आईला सूचेना कसे समजावे कळीला जीवन चांगलं जगायचं असेल तर शेजारपाजार हवाच त्यांचा रागराग करून कसं चालेल त्यांच्याशी न बोलून कसं जमेल! मग एक दिवस असा आला कळीला शेजारधर्म शिकवून गेला का कुणास ठाऊक कसे पण बागेत आले ससे करू लागले धमाल त्यांनी मोठीच केली कमाल धावपळीत त्यांच्या झाले कितीतरी नुकसान कित्येक फुलझाडे पडली मोडून कित्येक फुले गेली गळून कळी खूप घाबरली जोरजोरात ओरडली कळीचा आवाज ऐकून शेजारची फुलझाडे आली धावून फुलझाडांच्या फांद्या वाकल्या कळीभोवती जमा झाल्या तितक्यात फुलपाखरे आली त्यांनी कळीची गोष्ट भुंग्यांना सांगितली आपली कळी आहे संकटात बातमी पसरली भुंग्यांच्या गोटात तशी भुंग्यांची टोळी तिथं आली गुणगुण आवाज करू लागली आवाज ऐकून ससे घाबरले सारे बागेच्या बाहेर पळू लागले पण भुंग्यांनी सशांचे चांगलेच घेतले चावे अद्दल घडवून सशांचा जीव वाचवला कळीचा सगळे ससे बागेबाहेर गेले कळीच्या मनात नवे विचार आले कळी म्हणाली सगळ्यांना माझ्या प्रिय मित्रांनो तुम्ही खूप आहात चांगले तुमच्यामुळेच मी वाचले मी तुमचा रागराग करायचे तुमच्याशी अबोला धरायचे पण आज मला माझी चूक कळाली माझा खोटा अभिमान गळून पडला संकटात मदत करतात तेच खरे मित्र हे मला उमगले शेजारधर्म हाच खरा धर्म हाच आनंदी जीवनाचा मंत्र कळीचे बोलणे ऐकून सगळ्यांना खूप समाधान वाटले कळीची आई तर खूपच खूश झाली मग कळीने हळूच स्वतःकडे पाहिले तर तिचे आता एका सुंदर फुलात रूपांतर झाले होते. कळीला तिचे नवे रूप खूप आवडले!
Comments
Add Comment