
काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा :श्रद्धा बेलसरे खारकर
अनिकेत सेवाभावी संस्थेत दिव्यांग, मतीमंद मुलांचे पुनर्वसन फार चांगल्या प्रकारे केले जाते असे समजले होते म्हणून मी शिवराज आणि मोनिका पाटील यांच्याबरोबर संस्थेत गेलो. आता संस्थेची टुमदार इमारत आहे. आम्ही येणार हे माहीत असल्याने तिथली मुले अंगणात वाट बघत होती. शिवराज आणि मोनिका हे नेहमी तिथे जात असल्याने त्यांची मुलांशी चांगली गट्टी दिसली. एका हॉलमध्ये आम्ही बसलो.
सर्व मुलांनी आपली आपली ओळख करून दिली. वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जण आपल्या नावानंतर काहीतरी वेगळे सांगायचा. एका मुलाने सांगितले ‘माझे नाव विष्णू. मी अनिकेत सेवाभावी संस्थेत आहे.’ एवढे सांगितल्यावर हात जोडून त्याने गणपतीची १२ नावे सांगितली. दुसऱ्याने नाव सांगितल्यावर लगेच एक कविता म्हणून दाखवली. तिसऱ्याने नावानंतर १० देशांची नावे सांगितली. मी तर भारावून गेले होते. नंतर या मुलांनी गाणी म्हटली. दोन समूह नृत्ये सादर केली.
संस्थेबद्दल माहिती देताना कल्पनाताई म्हणाल्या, ‘शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे माझे लग्न १७ व्या वर्षीच झाले. लगेच एक मुलगी झाली. दीड वर्षाने दुसरा मुलगा झाला. मात्र त्याची बौद्धिक वाढ होताना दिसत नव्हती. आम्हा पती-पत्नींना काळजी वाटू लागली. अनिकेत दोन वर्षांचा झाल्यावर आम्ही त्याला डॉक्टरांना दाखवले. त्यांनी ‘हा १००% मतीमंद आहे आणि त्याच्यात सुधारणा होणे जवळजवळ अशक्य आहे’ असे सांगितले. कुठे बाहेर जायचे असेल, तर त्याला घरी बांधून ठेवून जात असत. आपल्या मुलाची अशी हेळसांड मला बघवली नाही. मी सरळ घर सोडले.
शिर्डी गाठली!’
त्यावेळी कल्पनाताईंना काय करायचे, कुठे जायचे हे काहीही माहीत नव्हते. तिथल्याच एका मतिमंदांच्या शाळेत त्यांनी केयरटेकरचे काम मिळवले. आईची व मुलाची राहण्याची सोय झाली. धुणे-भांडी, सफाई अशी कामे करत असताना त्यांना तेथे स्पेशल डी. एड. चा कोर्स सुरू असल्याचे समजले. काम करून त्यांनी तो कोर्स चांगल्या मार्काने उत्तीर्ण केला. मग त्यांना पुण्यात मतिमंदांच्या एका शाळेत मुख्याध्यापिकेचे काम मिळाले. तिथे मुलाचीही राहण्याची सोय झाली. दरम्यान अनिकेत १८ वर्षांचा झाला. शासकीय नियमाप्रमाणे वयाच्या १८ व्या वर्षांनंतर संस्थेत ठेवता येत नाही. त्यावरून कल्पनाताईंचे संस्थाचालकांशी वाद झाले. त्याच संस्थेत अनिकेतसारखीच अजूनही काही मुले अशी होती की ज्यांचे वय १८ पूर्ण होत होते. त्यांचाही पुढील आयुष्याचा, विशेष म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशीच कुठे राहायचे हा प्रश्न पुढे आवासून उभा होता.
“बस झाली ही नोकरी! आता स्वत:ची संस्था उभारायची” असा विचार करून कल्पनाताईंनी राजीनामा दिला.
स्वत:च्या पगारातून जमवलेल्या पैशांतून पुण्यातील ‘शिवणे’ येथे एक घर भाड्याने घेतले! मात्र या माऊलीची ही जागा फक्त दोघांसाठी नव्हती, तर १० वर्षे नोकरी केल्यामुळे जमलेल्या ऋणानुबंधातून जुन्या संस्थेतील २४ मुलं-मुलीसुद्धा त्यांच्याबरोबर आली. असा हा जगावेगळा संसार मांडताना कल्पनाताईंनी स्वत:च्या ‘अनिकेत सेवाभावी संस्थेची’ नोंदणी केली.
आज अनिकेत संस्थेत ५५ मुलं-मुली आहेत. ती सर्व मतीमंद असल्यामुळे त्यांना सांभाळणे ही २४ तास चालणारी तारेवरची कसरत आहे. त्यांचे मूड्स बदलत असतात. वयात येणाऱ्या मुलांचे प्रश्न तर खूपच अवघड बनतात. या मुळात मुलांमध्ये शक्ती जास्त असते आणि त्या शक्तीला कार्यरत ठेवले नाहीत, तर मग मुले हिंसकसुद्धा बनतात. सकाळी ५ वाजल्यापासून रात्री १० पर्यंत मुलांना विविध गोष्टीत कार्यरत ठेवावे लागते. दुबई इथे झालेल्या पॅरा-ऑलिम्पिक स्पर्थेत तिला ब्राँझ पदक मिळाले. आज जुलेखा तिथल्या लहान मुलांचा आधार बनली आहे. तिची ही प्रगती कल्पनाताईंना उभारी देते. दुसरी मुलगी कविता चांडोसकर ही मुंबईच्या फुटपाथवर पडलेली आढळली होती. तीही आता संस्थेत स्थिरावली आहे.
कल्पनाताई मोठ्या प्रेमाने या मुलांचा साभाळ करतात. मुलांनी छोटी-मोठी कौशल्य शिकून स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. काही मुलांना विविध खेळात रस असतो तो हेरून तसे प्रशिक्षण त्यांना देण्याचा कल्पनाताईंचा प्रयत्न असतो. आजवर संस्थेतील मुलांनी विविध स्पर्धांमधून ३५० बक्षिसे मिळवली आहेत याचा कल्पनाताईंना अभिमान वाटतो. अनेक मुलांना नियमित वैद्यकीय आणि मानसिक उपचाराची गरज असते.
बहुतेक मुलांना दररोज गोळ्या द्याव्या लागतात. हे काम खूप खर्चिक आहे. यासाठी मदतीची गरज आहे. कल्पनाताई म्हणतात, ‘मानसोपचार करणाऱ्या डॉक्टरांची फी खूप जास्त असते. ती संस्थेला अजिबात परवडत नाही.’ तरीही जिद्दीने त्या प्रयत्न करत आहेत. साने गुरुजींचे एक वाक्य लहानपणी वाचले होते, “मुले म्हणजे देवाघरची फुले.” कल्पनाताईंनी सांभाळलेली ही देवघरच्या फुलांची छोटीसी बाग पाहून परतताना मनात विचार आला – पुण्यात एकापेक्षा एका नामांकित मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, हॉस्पिटल्स आहेत.! अशा डॉक्टरांना आठवड्यातून एकदोन तास या अजाण जीवांसाठी द्यावासा वाटणार नाही का? त्यांना ही संस्था मोठी करायची आहे.
आज इथे ५५ मुलं-मुली आहेत. बहुतेक अनाथ आहेत, तर काहींना घरच्यांनी इथे आणून सोडले आहे. पहिले चार-सहा महिने असे पालक मुलांची फी भरतात. नंतर हळूहळू त्यांचे पैसे येणे बंद होते आणि मग फोनही येत नाहीत. कल्पनाताई अशा पालकांना अनेकदा फोन करून सांगतात, ‘तुमची अडचण असेल, तर पैसे पाठवू नका, पण निदान येऊन मुलांना अधूनमधून भेटून तरी जा. त्यांना फार बरे वाटेल हो!’ पण निर्ढावलेले पालक परत मुलांना भेटायलाही येत नाहीत.
मुलांच्या सहवासात ४ तास कसे गेले समजलेही नाहीत. निघताना कल्पनाताई म्हणाल्या, ‘जुलेखाला एक मेडल नुकतेच मिळाले आहे. ते तुमच्या हाताने तिला द्या. आपण फोटो काढू या.’ मी मेडल तिच्या गळ्यात घातले. फोटो काढला. मी हात मिळवून तिचे अभिनंदन केले. पाठीवर कौतुकाने थोपटले. त्यावर आनंदाने ती मला म्हणाली, “माझी नवीन चांदीची चैन बघा.” मी चैन हातात धरून बघितली आणि तिला गंमतीने म्हणाले, “अरे वा! जुलेखाताई, किती छान चैन आहे तुमची! इतकी सुंदर चैन तर माझ्याकडेही नाही!” त्यावर मला काही कळायच्या आत तिने एक क्षणही विचार न करता झटक्यात ती चैन काढून माझ्या हातात दिली! “घ्या तुम्हाला!” तिच्या या निरागस कृतीने मी गदगदून गेले, डोळे पाणावले! चैन परत तिच्या गळ्यात घालून निघाले.