Sunday, July 6, 2025

आधुनिक काळातील ‘पिठोरा चित्रकला’

आधुनिक काळातील ‘पिठोरा चित्रकला’

विशेष : लता गुठे


भारतीय संस्कृतीविषयी अनेक दिवस लेख लिहीत आहे. यामध्ये पूर्वी मधुबनी चित्रशैली आणि वारली चित्रशैली याविषयी लिहिले आहे. आता ‘पिठोरा चित्रकला याविषयी हा लेख आहे. काही जिल्ह्यांमध्ये याला ‘पिथोरी’ चित्रकला असंही म्हटलं जातं. हा लेख संस्कृती, परंपरा, तंत्र, प्रतीकात्मक आणि आधुनिक संदर्भ हे पैलू डोळ्यांसमोर ठेवून दिला आहे. अनेकांना या चित्रकलेविषयी फारशी माहिती नाही; परंतु प्रदर्शनामध्ये वस्तूंवर व पेंटिंग्जमध्ये ही चित्रकला पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी प्रदर्शनामध्ये फिरत असताना तेथील ठेवलेल्या वस्तूंवर अशी चित्र पाहायला मिळाली आणि त्या चित्रांनी माझे लक्ष आकर्षित केले.


दुकानदाराकडे चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, ताई ही पिठोरा चित्रकला आहे. आमच्या आदिवासी भागांमध्ये अशी चित्रं पिढ्यांनपिढ्यांपासून काढली जातात. मला ही चित्रकला खूप आवडली. चला तर जाणून घेऊया पिठोरा चित्रकला... तशी ही चित्रकला वारली चित्रकलेसारखीच आहे; परंतु यामध्ये ही चित्रं काढण्यामागे असलेला उद्देश वेगळा असल्यामुळे फरक आहे. वारली चित्रकला ही फक्त पांढऱ्या रंगामध्ये काढलेली असते आणि पिठोरा चित्रकला ही अनेक रंगांमध्ये रेखाटलेली असते. दुसरा फरक म्हणजे वारली चित्रशैली ही कुठल्याही भिंतीवर, कपड्यांवर काढली जाते; परंतु पिठोरा चित्रकला ही फक्त घरांच्याच भिंतीवर काढतात.


विविधतेने नटलेल्या भारतीय वारशामध्ये अशा अनेक कला आहेत ज्यांचे पिढ्यानपिढ्या जतन करण्याचा प्रयत्न करून त्या आजच्या काळातही टिकून आहेत. याचं कारण म्हणजे आदिवासी भागांमध्ये अजूनही आधुनिकतेचे वारे पोहोचलेले नाही. जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे आदिवासी त्यांची संस्कृती अजूनही जपण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच भारताच्या संस्कृतीमध्ये आदिवासी लोककला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. यामध्ये ‘पिठोरा चित्रकला’ सणसमारंभामध्ये या लोकचित्रकलेला महत्त्वाचे स्थान आहे. ही चित्रकला मुख्यतः मध्य प्रदेश, गुजरात आणि काही प्रमाणात राजस्थान या भागांतील राठवा, भील आणि नायक आदिवासी समुदायामध्ये प्रचलित आहे. ही कला फक्त सौंदर्याच्या दृष्टीने नाही, तर ती आध्यात्मिक श्रद्धा, सामाजिक व्यवस्था आणि जीवनपद्धतींचे प्रतीक आहे.


या चित्रकलेचा उगम कसा झाला? याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेऊया... पिठोरा चित्रकलेचा उगम प्राचीन आदिवासी परंपरेत आहे. ही कला आदिवासींचा ‘पिठोरा देव’ आहे. ज्या समाजातील लोक पिठोरा देवाची आराधना करतात त्या समाजातील लोक या देवतेच्या पूजेसाठी घराच्या भिंतीवर ही चित्रे काढतात. यामागे अध्यात्मिक भावना असते. ‘पिठोरा’ ही एक अधिष्ठानात्मक, देव-पूजनात्मक व सौंदर्यप्रधान परंपरा आहे. आदिवासी मान्यतेनुसार, एखादी मनोकामना पूर्ण झाली की कुटुंबाने ‘पिठोरा’ चित्र तयार करून देवाला वंदन करावे असा प्रघात आहे. या चित्रकलेचे वेगळेपण असे आहे, पिठोरा चित्रे सामान्य माणूस काढत नाही. ती काढण्यासाठी ‘लखारा’ नावाच्या विशिष्ट चित्रकाराला बोलावले जाते. लखारा हा फक्त पुरुष असतो आणि विशेष विधी व आचारांचे पालन करत तो हे चित्र पूर्ण करतो. स्त्रिया ही चित्रं काढत नाहीत, पण त्यात सहभागी असतात.


भिंतीवर हे चित्रं काढण्याआधी भिंती स्वच्छ केल्या जातात. लिंपून घेण्यासाठी शेण, चुना आणि पाणी याचे मिश्रण तयार करून ती जागा सपाट केली जाते. भिंत सुकल्यानंतर पिठोरा चित्रकलेची प्रक्रिया विधीपूर्वक सुरू होते.


पिठोरा चित्रकलेची रचना विशिष्ट असते. मधोमध घोड्यावर बसलेला पिठोरा देव प्रथम काढतात. नंतर त्याच्या बाजूने इतर पात्रं रेखाटली जातात. यामध्ये, देवी-देवता, निसर्गदृश्य, गुरंढोरं, बैल, साप, वाघ, सूर्य, चंद्र. अशा निसर्गातील अनेक घटकांचा समावेश असतो. ज्यांचा मानवी जीवनामध्ये सहभाग असतो. याचबरोबर काही जीवनदृश्यही काढतात त्यामध्ये विवाह, शेती, नृत्य, सण-उत्सव अशाप्रकारे हे चित्र पूर्ण होते.


अनेक रंगांचा वापर करून चित्र रंगवले जाते, यामध्ये पूर्वीच्या काळी नैसर्गिक रंगाचा वापर केला जात असे त्यामध्ये हळद, कोळसा, गेरू आणि पानांफुलांच्या रंगांचा वापर केला जात असे. आता बाजारात मिळणारे रंगही या चित्रांसाठी वापरतात. या रंगांचे सूचक अर्थही असतात. यामध्ये लाल रंग शक्तीचे प्रतीक आहे, पांढरा रंग
पवित्रता दर्शवितो, तर हिरवा रंग समृद्धी यासाठी वापरतात.


‘पिठोरा चित्रकला’ ही केवळ सौंदर्यकलाच नाही, तर एक अलौकिक संवाद आहे निसर्ग, देवता आणि मानव यांच्यातील आणि चित्रातील काही आकार प्रतीकात्मक असतात. यामध्ये देवाचा घोडा हे वाहन शक्तीचे प्रतीक आहे. तसेच सूर्य, चंद्र कालचक्र दर्शवितात, साप संरक्षणाचे प्रतीक आहे. बैल शेतीसाठी उपयोगी असल्यामुळे या चित्रांमध्ये बैलांचाही समावेश असतो आणि वधूवर हे सामाजिक जीवनचक्र चालविणारे कुटुंबाचे वाहक आहेत त्यामुळे या सर्व चित्रांना आदिवासींच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. एवढेच नाही, तर या चित्रकलेमागे सामाजिक आणि धार्मिक भूमिकाही असते. पिठोरा चित्र काढणे ही एक धार्मिक पूजाअर्चा आहे.


कोणतेही उत्सव, विवाह, बाळंतपण, संकट टळणे, नवसंस्थेची सुरुवात इ. निमित्तांनी ही पूजा केली जाते. हे चित्र म्हणजे कुलदेवतेचे आभार मानून भविष्यासाठी देवतेचा आशीर्वाद घेणे अशी या मागची धारणा असते.आधुनिक काळातील पिठोरा चित्रकला आता ही चित्रकला आदिवासी परिसरापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती आता कलादालनांमध्ये, विदेशी प्रदर्शनांमध्ये, घर सजावटीच्या वस्तूंमध्ये वापरली जाते. ही एक सांस्कृतिक वारशाची ओळख म्हणून पुढे येत आहे. अनेक संस्था आणि सरकार यांच्यातर्फे ही कला जतन करण्यासाठी कार्य सुरू आहे.


सारांश : पिठोरा चित्रकला ही केवळ एक आदिवासी चित्रशैली नाही, ती एक जिवंत वास्तवाचे दर्शन घडविते आणि त्यामधून सांस्कृतिक संवाद घडतो. त्याचबरोबर हे एक श्रद्धेचं रंगीत दर्शनच आहे. तिचं संवर्धन म्हणजे आदिवासी समाजाच्या जीवनमूल्यांचं जतन होय. या चित्रकलेमधून आपण भारतीय संस्कृतीतील वारसा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करत असतो.अशा या छोट्या-छोट्या गोष्टींमधून या कलेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा लेख...

Comments
Add Comment