
माफी न मागितल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा
बारामती: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अपशब्द वापरले. या विरोधात बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव (Nitin Yadav) यांनी हाके यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीशीत सात दिवसांत माफी न मागितल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे. हाके यांनी जलसमाधी आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ केली होती. अजित पवार ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप, तसेच 'महाज्योती'ला निधी मिळत नसल्याचा दावाही त्यांनी केला होता.
हाके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नितीन यादव यांनी ॲड. शंतनू माळशिकारे यांच्या वतीने आज (रविवार) नोटीस पाठवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची येत्या सात दिवसांत हाके यांनी लेखी माफी मागावी. हाके यांनी सात दिवसांत लेखी माफी न मागितल्यास त्यांना न्यायालयात खेचून दिवाणी, फौजदारी आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असेही नोटिशीत म्हटले आहे. प्रा. लक्ष्मण हाके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करत शिवराळ भाषेत शिवीगाळ करत आहेत, असा आरोपही यादव यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
लक्ष्मण हाके यांनी त्यांचे समर्थक आणि काही विद्यार्थ्यांसह नुकतेच गिरगाव चौपाटी परिसरात जलसमाधी आंदोलन केले होते. हाके भर समुद्रात विद्यार्थ्यांसह खोलवर गेले. तिथे त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. "आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात. महाज्योतीला निधी मिळावा, असं ते म्हणाले आणि नंतर पोलिसांनी ताब्यात घेताच लक्ष्मण हाके यांनी पातळी सोडत अजित पवारांना थेट आरोप, शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अजित पवार राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यांच्या खात्यातून ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 'सारथी'ला पैसे मिळतात, पण 'महाज्योती'ला पैसे मिळत नाहीत. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, असे आरोप लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी केले.