
एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल ३३६ धावांनी जिंकला आहे. या सामन्यात विजय मिळवम्यासाठी इंग्लंडला ६०८ धावांचे आव्हान मिळाले होते. याचा पाठलाग करताना यजमान संघ पाचव्या दिवशीच्या दुसऱ्या सेशनमध्ये ऑलआऊट झाला.
भारताने पहिल्यांदा बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवला आहे. याआधी ८ सामने खेळवले गेले होते. त्यापैकी ७ सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला होता. तर एक सामना अनिर्णीत राहिला होता. भारतीय संघाने या मैदानावर पहिला कसोटी सामना जुलै १९६७ मध्ये खेळला होता. यात भारताला १३२ धावांनी पराभव मिळाला होता. आता भारताने ५९ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळत नसतानाही भारताने हा सामना जिंकला आहे.
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत आपला दुसरा डाव ६ बाद ४२७ वर घोषित केला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावांत ५८७ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारावर भारताला १८० धावांची मोठी आघाडी मिळाली होती.
कर्णधार म्हणून गिलचा पहिला विजय
कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलने मिळवलेला हा पहिला विजय आहे. त्याने संपूर्ण कसोटीत दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने अडीचशेहून अधिक धावा केल्या. तर दुसऱ्या डावात दीडशेहून अधिक धावांची खेळी केली होती. याचा अर्थ भारताच्या या धावसंख्येमध्ये ४००हून अधिक धावा एकट्या गिलच्याच होत्या.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात खराब राहिली. त्यांनी ५० धावांपर्यंत आपले तीन विकेट गमावले होते. जॅक क्राऊलीला मोहम्मद सिराजन बाद केले. तर बेन डकेट आणि जो रूटला आकाशदीपने बाद केले. यानंतर ओली पोप आणि हॅरी ब्रूक यांनी चौथ्या दिवशीच्या खेळात इंग्लंडला कोणतेही नुकसान होऊ दिले नाही.
पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यानंतर आकाशदीपने भारताला लवकर यश मिळवून दिले. आकाशने ओली पोपला बोल्ड केले. त्याने २४ धावा केल्या. त्यानंतर आकाशने हॅरी ब्रूकला बाद करत भारताला पाचवे यश मिळवून दिले. ब्रूक बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स आणि जेमी स्मिथने सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत इंग्लंडला सांभाळण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदरने लंचच्या आधी बेन स्टोक्सला बाद करत ही भागीदारी तोडली.