दिंडी मराठीची!

  71

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर


आता थांबायचं नाय’ हा अलीकडचा चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या सुरुवातीला एक दृश्य असे आहे की, एका शाळेतील कार्यक्रमाला आई-बाबा उपस्थित आहेत. बाबांना त्या शाळेला साजेसे भाषण करायचे आहे. ते बोलण्याचा तोडका-मोडका प्रयत्न करतात. महानगरपालिकेत सफाई कामगार असलेला तो बाप! त्याला सावरायला पुढे येते, ती त्याची लेक आणि फर्डे इंग्रजीत बोलत सर्वांची मने जिंकते.


ज्या शाळेच्या मंचावरून ती बोलते आहे ती इंग्रजी शाळा आहे. चित्रपटातील सकारात्मक संदेश, शिक्षणाचे महत्त्व याविषयी इथे मी काही बोलणार नाही. खूप वेळ मी प्रारंभीच्या दृश्यातच गुंतून राहिले. कष्टकरी वर्गाच्या मनावर हे बीज पेरले गेले आहे की पोटाला चिमटा काढा पण मुलांना इंग्रजी शाळेत घाला. तुम्ही परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण केले नाही पण ते स्वप्न मुलांमध्ये पाहा. त्यांना इंग्रजी शाळेत शिकवणे हीच आयुष्याची इतिकर्तव्यता. एखाद्या चित्रपटातून असा संस्कार घडणे यात फारसे वावगे वाटणार नाही कदाचित कुणाला, पण मला हा विषय अस्वस्थ करतो.


भाजीवाले, रिक्षावाले, धुणी-भांडी करणारी एखादी बाई, एकूण तळागाळाच्या वर्गाला इंग्रजी शाळेचे वाटणारे आकर्षण शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पसरले आहे. इंग्रजी शाळा म्हणजे उत्तम शिक्षण असा समज सर्वदूर पसरला आहे. कारण उच्चवर्ग नि मध्यम वर्गाने मराठी शाळांवर विश्वास ठेवला नाही. मराठी शाळांवरच कशाला आपला समाज मायभाषेवरचाच विश्वास गमावून बसला आहे. मायबोली ही लादण्याची गोष्ट नाही, ती मनात रुजण्याची गोष्ट आहे. मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियम आहे. मराठी शाळा जगल्या पाहिजेत.


महाराष्ट्राबाहेरून येऊन इथे वसणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलेच पाहिजे. दैनंदिन सर्व समाज व्यवहार मराठीत झालेच पाहिजेत असा आग्रह आपण कितीसा धरला? उच्च शिक्षणातून मराठीला कधीच आम्ही बाद केले, शालेय शिक्षणात तिच्या अस्तित्वाची लढाई आम्ही जवळपास हरलोच आहोत. जोपर्यंत मराठी माणूस आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकवण्यास आपण कटिबद्ध आहोत असे म्हणत नाही तोवर मराठी विषयीची त्याची निष्ठा कशावरून खरी?


दुर्दैवाने मराठी हा आता राजकारणाकरिता उरलेला विषय झाला. हत्यार म्हणून मराठीला सोयीस्करपणे वापरणारे लोक मराठीच्या आड लपत आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकारण करून लाभ नाही, हे ओळखून मराठीचा मुद्दा कुठल्याही पक्षांच्या अग्रक्रमी कधीच ठेवला नव्हता. आज त्याच मायमराठीला लोक खेळणे बनवून खेळत आहेत.


मराठीच्या विकासाचे कोणते मुद्दे आज राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आहेत?
याचे उत्तर प्रामाणिकपणे कुणी देणार आहे का? तिच्याशी सहज प्रतारणा करणाऱ्यांना मायमराठीने नेहमीच क्षमा केली आहे. ती सर्व काही मुकेपणे पाहते आहे म्हणून आपले फावले आहे. ती मात्र उदारपणे म्हणते आहे, “पांडुरंगा माझ्या लेकरांना क्षमा कर आणि मराठीची दिंडी पुढे नेण्यासाठी त्यांना बळ दे .’’

Comments
Add Comment

ध्यास मराठीतून शिकण्याचा

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर मी १३ वीत असताना आमच्या कोकजे सरांनी नेरळ येथील वेगवेगळ्या शाळांची ओळख करून दिली.

हरवलेलं माणूसपण

मोरपीस: पूजा काळे स्वामी तुम्ही पाहताय ना! काळ सोकावलायं, माणसातील माणूसपण हरवत चाललयं! देवळाबाहेरच्या परिसरात

शेतकरी बांधवांना वरदान ठरणारी 'सब्जी कोठी'

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे रक्षाबंधन हा बहीण-भावांच्या नात्याचा उत्सव. भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणून ती त्यास

सण आयलाय गो...

उदय खोत नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा जिव्हाळ्याचा सण. दरवर्षी दर्याराजाची पूजा करून नारळ अर्पण करून

हसरी शंभरी...

चारुहास पंडित : प्रसिद्ध व्यंगचित्रकार आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून शब्देवीण संवाद साधणारे ज्येष्ठ

सुखावणारा ऋतुगंध

तुझी माझी पहिली भेट म्हणजे मृद्गंधाचे अनमोल दरवळते अत्तर नाते तुझे नी माझे हृदयस्थ सुंदर बहरत राहते माझ्या मनी