
स्नेहधारा : पूनम राणे
सकाळचे ९ वाजले होते. सुदेश घाईघाईने कामानिमित्त मुलाखत द्यायला निघाला होता. तिथूनच तो भाड्याच्या घराचे पैसे देण्यासाठी मालकाच्या घरी जाणार होता. बाहेर पाऊस चालू होता. अशा वातावरणात रस्त्यावर तुरळक रिक्षा दिसत होत्या. सुदेशने एका रिक्षाला थांबवलं.
रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली. आदराने या... या... बसा. ‘‘सकाळपासून पावसाने हौदोस मांडला आहे. जणू काही आभाळच फाटलं असं वाटतंय!” अहो, माणसानं घराबाहेर तरी कसं पडावं ! ‘‘आणि ओले चिंब कपडे घेऊन दिवसभर कामावर कसं बसावं.” “ पण काही का होईना, यावर्षी पाऊस मस्तच पडतोय.” सुदेश म्हणाला. अंधेरी येईपर्यंत दोघांच्या गप्पा चालूच होत्या. घाई घाईतच सुदेश रिक्षाचे पैसे देऊन ऑफिसच्या दिशेने वळला. मुलाखतीसाठी ऑफिसच्या बाहेर वीस पंचवीस तरुण बसले होते. अकरा वाजता सुदेशचा नंबर येणार होता. कागदपत्र चेक करावीत, म्हणून सुदेश पिशवी शोधू लागला.
मात्र त्याच्या लक्षात आले की आपली फाईल पिशवीत आहे आणि पिशवी रिक्षात विसरून आलो. पाऊस असल्यामुळे घराच्या भाड्याचे पैसे प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून त्याने पिशवीतच ठेवले होते.
अंधेरी स्टेशनला रिक्षावाला उभा होता. पावसामुळे रिक्षा आतून फारच ओली झाली होती. एवढ्यात एका प्रवाशाने रिक्षा... म्हणून आवाज दिला. रिक्षाचा दरवाजा उघडताच आत सीटवर त्याला पाणी दिसले. प्रवासाने आतून रिक्षा पुसून द्यायची विनंती केली. कपडा घेऊन रिक्षावाला मागे वळून पाहतो तर काय ! शीटच्या बाजूला त्याला एक पिशवी दिसली. तत्काळ रिक्षावाल्याने त्या प्रवाशाला थांबवलं आणि पहिल्या प्रवाशाला ज्या ठिकाणी सोडलं होतं, त्या ठिकाणी भरधाव रिक्षा घेऊन निघाला. त्याने पिशवीतील फाईल उघडून त्या प्रवाशाचे नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फाईल बरोबरच प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेले पैशाचे पाकीट त्याला दिसले. सुदेश महाजन. हे नाव लक्षात ठेवून थेट त्या ऑफिसकडे वळला. सुदेश महाजन... सुदेश महाजन... असा बाहेरून जोरात आवाज देऊ लागला. सुदेश डोक्याला हात लावून खुर्चीत बसला होता. पावसातही तो घामाने पुरता भिजला होता.
आपल्याला आवाज कोण देतंय म्हणून सुरेश चपळाईने बाहेर आला. सुदेशला पाहताच रिक्षावाला आत गेला. म्हणाला, ‘‘साहेब... ही आपली पिशवी यात कागदपत्र आणि तुमचे पैसे आहेत. सुदेशचा आनंद गगनात मावेनासा झाला. सुदेश ५०० रुपयांची नोट रिक्षावाल्याच्या हातावर ठेवत म्हणाला, ‘‘दादा हे पैसे ठेवून घ्या.” यावर रिक्षावाला म्हणाला, ‘‘नको, नको, तुमची महत्त्वाची मालमत्ता तुमच्याकडे पोहोचली, हेच मी माझं भाग्य समजतो.” आणि आज कोणता दिवस आहे, माहीत आहे ना! ‘‘आषाढी एकादशी. रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून सुदेश म्हणाला, आज मला प्रत्यक्ष आपल्या रूपात पांडुरंगाचे दर्शन झाले आहे.