
मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक महत्त्वाची खूण होती. आता ही खूण नसेल. आरोग्याच्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला असला तरी, मुंबईच्या इतिहासाशी जोडलेली एक महत्त्वाची ओळख पुसली जात असल्याची भावना अनेकांना सतावते आहे.
अनेक वर्षे मुंबईच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेला कबुतरखाना आता अंतिम श्वास घेत आहे. कबुतरांना धान्य दिल्याने पुण्य मिळते या श्रद्धेपोटी अनेक मुंबईकर इथे येत असत. मात्र, कबुतरांची वाढती संख्या आणि त्यांच्या विष्ठेमुळे होणारे श्वसनाचे गंभीर आजार (हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनाइटिस आणि अस्थमा) लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) मुंबईतील सर्व ५१ अधिकृत कबुतरखाने तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
View this post on Instagram
याच पार्श्वभूमीवर, दादरमधील कबुतरखान्याचा एक शेवटचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक मुंबईकर भावूक झाले आहेत. काही जण या निर्णयाचे स्वागत करत आहेत, तर काही "या कबुतरांचे आता काय होणार?" या चिंतेने ग्रासले आहेत.
या संदर्भात एक लक्षणीय सूचना देखील पुढे आली आहे. कबुतरखान्याच्या जागेवर कोणत्याही व्यक्तीचा फोटो लावण्याऐवजी कबुतराचे शिल्प लावावे, अशी मागणी काही मुंबईकरांनी केली आहे. यामुळे 'कबुतरखाना' ही ओळख कायम राहील आणि ती आठवण जपली जाईल, अशी त्यांची भावना आहे.
प्रशासनाने कबुतरांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक धोके लक्षात घेऊन हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. दादरचा कबुतरखाना ही केवळ एक जागा नव्हती, तर मुंबईच्या अनेक आठवणी आणि भावना तिच्याशी जोडलेल्या होत्या. या ऐतिहासिक स्थळाच्या बंदमुळे मुंबईच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आता संपणार आहे.