Saturday, July 5, 2025

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा ५० टक्के

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा ५० टक्के

जुलैच्या पहिल्याच आठवड्यातील पावसाने साधली किमया


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली असून सर्व धरणांमधील पाणी साठा हा ५० टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. मुंबईकरांना पाणी पुरवठा करणारी ही सर्व धरणे जुलैच्या पहिल्या महिन्यात भरली गेल्याने पुढील काळात पाऊस लांबला गेला तरी तलावातील पाण्याची पातळी ३१ सप्टेंबरमध्ये वाढ होवून मुंबईकरांना वर्षभर पुरेल इतका पाणी साठा जमा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


दरवर्षी मुंबईत जुलै अथवा ऑगस्टमध्ये हजेरी लावत असल्यामुळे तलावातील पाणीपातळी घटत जाते आणि यामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करण्यात अडचणी येवून कपात करण्याची वेळ येते.परंतु यंदा पावसाने मे महिन्यातच हजेरी लावल्यानंतर जून महिन्यापासून तलाव क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात होऊ लागली. त्यामुळे शुक्रवारी सकाळपर्यंत सर्व धरणांमधील पाण्याच्या पातळीचा अंदाज घेतला असता हा साठा ५० टक्क्यांपर्यंत झाला असल्याचे दिसून आले आहे.गेल्या अनेक वर्षात मे महिन्यात पाऊस व जून मधेच तलाव ५०. ७५ टक्के भरल्याचे घडले नाही. मुंबईला १ ऑक्टोबर पासून वर्षभर पुरेल १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याच्या साठ्याची आवश्यकता असते. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात सर्व धरणांमधील पाण्याचा साठा ३ जुलैपर्यंत ५० टक्के एवढा जमा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.


मुंबईला वर्षभरासाठी सुमारे १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याची गरज असते. त्यातुलनेत शुक्रवारी ३ जुलै रोजी ५०.७५ टक्के म्हणजेच ७,३४,५६२ दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झाला होता. गेल्यावर्षी याच दिवशी ८.५९ टक्के म्हणजे १,२४,३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला होता. तर सन २०२३ मध्ये याच दिवशी १७.६६ टक्के म्हणजे २,५५,६२२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला होता. गुरुवारी सकाळी ६ ते शुक्रवारी सकाळी ६ वाजता संपलेल्या २४ तासात अप्पर वैतरणा धरणात तलावात ३८ मि.मी,मोडक सागर धरणांत ७८ मि.मी, तानसा तलावात ५६ मि.मी, मध्य वैतरणा तलावात ७० मि.मी,भातसा धरणांत ६२ मि.मी, विहार तलावात २६ मि.मी, आणि तुळशी तलावात ५४ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. सध्या तलाव आणि धरणांमधील पाणी साठा हा येत्या १ जानेवारी २०२६ पर्यंत पुरेल इतका आहे.

Comments
Add Comment