Saturday, July 5, 2025

Indian Railways Veg Meal Price : स्टेशनवर ७० तर ट्रेनमध्ये ८० रुपयांत मिळणार शाकाहारी जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

Indian Railways Veg Meal Price : स्टेशनवर ७० तर ट्रेनमध्ये ८० रुपयांत मिळणार शाकाहारी जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

मुंबई : भारतात रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कोटींमध्ये आहे. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेनं प्रवास करत असतात. जर तुम्हीही लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर खाण्यापिण्यासाठी आपण अनेकदा काही ना काही घेत असतो. जे घरून अन्न आणू शकत नाहीत ते स्टेशनवर उपलब्ध असलेल्या अन्नावर किंवा ट्रेनच्या पेंट्रीमध्ये मिळत असलेल्या अन्नावर अवलंबून असतात. जर तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये असलेल्या अन्नावर अवलंबून असाल तर ही महत्वाची माहिती तुमच्यासाठी आहे. खरं तर, रेल्वे मंत्रालयानं त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर व्हेज मीलची (स्टँडर्ड कॅसरोल) किंमत आणि त्याचा संपूर्ण मेनू शेअर केला आहे.




किंमत अधिक आकारली जाते


मोठ्या प्रमाणात लोक घरी बनवलेले अन्न घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करतात पण काही लोकांना घरात बनवलेलं अन्न ट्रेनमध्ये आणणे शक्य होत नाही. अशा लोकांना स्टेशनवर किंवा ट्रेनमध्येच खाद्यपदार्थ खरेदी करावे लागतं. यासोबतच, अशा प्रवाशांची संख्या देखील खूप जास्त आहे ज्यांना रेल्वेने निश्चित केलेल्या किमतींची माहिती नाही. त्यामुळे, रेल्वे मंत्रालयाची ही माहिती त्या सर्वचं प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची ठरते.





रेल्वे मंत्रालयानं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक माहिती शेअर केली आहे. स्टेशनवर उपलब्ध असलेल्या व्हेज मीलची (स्टँडर्ड कॅसरोल) किंमत ७० रुपये आहे, तर ट्रेनमध्ये त्याची किंमत ८० रुपये आहे.



व्हेज मीलमध्ये काय असणार?



  • व्हेज मीलच्या (स्टँडर्ड कॅसरोल) मेनूमध्ये साधा भात (१५० ग्रॅम)

  • जाड डाळ किंवा सांबार (१५० ग्रॅम)

  • दही (८० ग्रॅम)

  • २ पराठे किंवा ४ रोट्या (१०० ग्रॅम)

  • भाजी (१०० ग्रॅम)

  • लोणच्याचं एक पॅकेट (१२ ग्रॅम)


रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ तक्रार करू शकता


जर तुमच्या प्रवासादरम्यान रेल्वे स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये तुम्हाला सांगितले गेले की व्हेज मीलची (स्टँडर्ड कॅसरोल) किंमत जास्त आहे किंवा त्याच्या मेनूमध्ये खाद्यपदार्थांची संख्या कमी आहे, तर तुम्ही रेल्वेची ही माहिती रेस्टॉरंट किंवा पेंट्री कर्मचाऱ्याला दाखवू शकता. जर यानंतरही कर्मचारी सहमत नसेल, तर तुम्ही रेल्वेकडे तक्रार करू शकता. अशा परिस्थितीत, तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X तसंच रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर किंवा RailOne ॲपवर Rail Madad द्वारेसुद्धा तक्रार करू शकता.

Comments
Add Comment