
रवींद्र तांबे
देशातील शेतीविषयक अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतीकामाचा अनुभव घेणे फार महत्त्वाचे असते. आजही आपल्या देशात शेती हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने मानवी जीवनात शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा पुस्तकात शेतीच्या धड्यांचा अभ्यास करीत असताना शेतात जाऊन काम केल्याने विद्यार्थ्यांना शेतीविषयक अधिक माहिती मिळते. यामध्ये नांगरणी, तरवा पेरणे, तरवा काढणे, रोव पेरणे, लावणी लावणे, कापणी करणे व झोडणे इत्यादी कामे करावी लागतात. तेव्हा सध्या पावसाळा सुरू आहे.
शेतीची कामेसुद्धा सुरू असून कोकणात भात लावणी चालू आहे. तशी वेगवेगळ्या प्रकारची शेतीसुद्धा केली जाते. अशावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष शेतीकामाचा अनुभव घेण्यासाठी अभ्यास दौरे शैक्षणिक संस्थांनी आयोजित करावेत. जेणेकरून त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडून शेतीक्षेत्राची अधिक गोडी निर्माण होण्याला मदत होईल. त्यासाठी विद्यार्थ्यांचे शेतीविषयक अभ्यास दौरे आयोजित करण्यात यावेत. शाळेबरोबर शेतातसुद्धा शेती हंगामात शाळा भरवली पाहिजे.
भारत हा शेतीप्रधान देश आहे. जरी पुस्तकातून शेतीचे धडे शिकविले गेले तरी प्रत्यक्षात शेती कशी केली जाते हे जवळून पाहता यावे तसेच प्रत्यक्ष शेतात काम करून एक नवीन अनुभव विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे शेतीविषयक अभ्यास दौरे आयोजित करण्यात यावेत. म्हणजे प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळून त्यांना त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडू शकते. तेव्हा सध्या पावसाळी शेतीची कामे सुरू आहेत. पाऊससुद्धा बऱ्यापैकी शेती योग्य लागत आहे. यात चिखलात नांगरणी, पेरणी, लावणी यांचा प्रत्यक्षात अनुभव मिळू शकतो.
महत्त्वाची बाब म्हणजे, शेतात काम केल्याचे विशेष समाधान मिळेल. याचा चांगला परिणाम शेतात प्रत्यक्ष काम केल्याने शेतीविषयक कामाची त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडणार आहे. शेतीच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करण्यापेक्षा वाफ्यात जाऊन चिखलात लावणी लावल्यामुळे त्याचा अनुभव संदर्भ पुस्तकाच्या पलीकडचा असतो. सध्या भात लावणीची कामे कोकणात जोरात चालू आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांना शेतीविषयक लागवडीची माहिती घेण्यासाठी शेती हंगामात विद्यार्थ्यांचे अभ्यास दौरे आयोजित करायला हवेत. यातून विद्यार्थ्यांना शेतीची आवड निर्माण होण्याला मदत होईल. ही समाधानाची बाब आहे.
आजही शेतकरी ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने शेती करतात. जर विद्यार्थ्यांना अशा अभ्यास दौऱ्यातून शेतीचे ज्ञान मिळाल्यास त्याचा फायदा ते आपल्या घरच्या शेतीत उत्तमप्रकारे बदल करून अधिक उत्पादन घेऊ शकतात. हे फक्त आपल्याला अनुभवातून मिळते. तसेच विद्यार्थ्यांना शेतकरीदादा यांचे शेतीविषयक मौलिक विचार व मार्गदर्शन मिळू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या पावसाळी शेती हंगाम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना पुस्तकातून शेतीचे धडे शिकविताना आता प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी अभ्यास दौरे करावेत. म्हणजे भाताची लावणी कशी करण्यात येते याची विद्यार्थ्यांना कल्पना येते. त्या आधी तरवा कसा काढायचा हे प्रत्यक्षात अनुभवता येते. लावणीसाठी चिखल कसा तयार केला जातो याचे वाफ्यातील चिखलाचे निरीक्षण करून पाहू शकतो. त्यासाठी नांगरणी कशी केली जाते, याची माहिती मिळते. सध्या बऱ्याच ठिकाणी नांगरणी ट्रॅक्टरने केली
जात आहे. सध्या क्वचित बैलांचे जोत बांधून नांगरणी केल्याचे पाहायला मिळते. बैलांच्या साहायाने केलेली नांगरणी अधिक गलगलीत होत असते. तशी ट्रॅक्टरने होत नाही. याचा चांगला परिणाम चिखलात लावणी लावताना बोटाला सहसा इजा होत नाही. त्यामुळे अधिक उत्साहाने भाताची लावणी लावली जाते. शेती हंगामातील अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्षात वाफ्यातील चिखलात लावणी लावल्याचा अनुभव येईल. बऱ्याच वेळा शेतीची कामे पूर्ण झालेली असतात. त्यावेळी शेतीच्या बांधावर जाऊन शेतीचा अभ्यास केला जातो. तेव्हा असे न करता आता पावसाळा ऋतू चालू आहे. यावर्षी पावसाळा ऋतू चालू होण्यापूर्वी वरुणराजाचे जोरात आगमन झाले होते.
आतासुद्धा समाधानकारक पाऊस लागत आहे. त्यामुळे कोकणात नांगरणी करून भात पेरण्यात येऊन आता तरवा काढून चिखल करून लावणी लावण्यात येत आहे. अशावेळी शाळेतील मुलांना प्रत्यक्ष लावणी कशी लावली जाते याचा अनुभव येण्यासाठी शेतीला अनुसरून धडे असतील अशा मुलांचे अभ्यास दौरे आता काढावेत. मुलांना चिखलात प्रत्यक्ष भाताची लावणी लावण्याचा अनुभव घेता येईल. हा शेतीमध्ये काम केल्याचा अनुभव त्यांना इतर काम करताना प्रेरणा देणारा ठरणार आहे.
हल्ली ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील मुलांना लावणीचा अनुभव येण्यासाठी शिक्षक शेतात नेऊन प्रत्यक्ष लावणी कशी लावली जाते याची माहिती व प्रात्यक्षिक दाखवून नंतर त्यांना लावणी लावायला सांगतात. तशी ग्रामीण भागातील मुले शेती कामात हुशार असतात. आई-वडिलांसोबत शेतात काम करीत असतात. त्यामुळे त्यांना दांडगा अनुभव शेती कामाचा असतो. बरीच कामे ग्रामीण भागातील मुले शाळा सांभाळून करतात. त्यांना अप्रत्यक्षपणे शेतीकामाचा अनुभव असतो. तेव्हा विद्यार्थ्यांना शाळेत शेतीविषयक धड्यांचा अभ्यास करताना प्रत्यक्षात शेतावर जाऊन शेतीविषयक अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौऱ्यांची गरज आहे.